वर्कलोड वाढला तर फिटनेस वाढवावा लागेल | पुढारी

वर्कलोड वाढला तर फिटनेस वाढवावा लागेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्कलोडचे कारण देत जगातील अनेक क्रिकेटपटू निवृत्ती किंवा विश्रांती घेत आहेत, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला विचारले असता, हे सर्वकाही आपल्या फिटनेसवर अवलंबून आहे. ज्या प्रकारचा आमचा फिटनेस आहे त्यामुळे आम्ही याबाबत कधी विचार केला नाही. लोड जर वाढत असेल तर त्यासाठी अधिक फिट व्हावे लागेल, असे उत्तर दिले. त्याच्या या उत्तराने पत्रकारांची बोलती बंद झाली.

सततच्या क्रिकेटमुळे वर्कलोड वाढत असल्याचा मुद्दा जगभरातील क्रिकेटपटूंनी उपस्थित केला आहे. सर्वप्रथम इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन या प्रकरणाला वाचा फोडली होती. अलीकडेच न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने सेंट्रल करारातून आपले नाव मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. भारताचे विराट कोहली, रोहित शर्मा हे निवडक सामने खेळत आहेत. अशा परिस्थितीत वर्कलोडबद्दल जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या उत्तराने पत्रकाराची बोलतीच बंद केली.

पाकिस्तानचा संघ आशिया चषक 2022 च्या आधी नेदरलँडच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारले की, लोड खूप होत आहे ना?, यावर बाबर आझमने म्हटले, जो तुम्ही प्रश्न विचारला आहे त्यावर मी एवढेच म्हणेन की हे सर्वकाही आपल्या फिटनेसवर अवलंबून आहे. ज्या प्रकारचा आमचा फिटनेस आहे त्यामुळे आम्ही याबाबत कधी विचार केला नाही. तुम्हाला वाटते का मी म्हातारा झालो आहे किंवा आम्ही म्हातारे झालो आहोत? लोड जर वाढत असेल तर त्यासाठी अधिक फिट व्हावे लागेल.

Back to top button