बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेेत शुक्रवारी भारताच्या मल्लांचा डंका वाजला. भारताच्या (CWG 2022) दीपक पुनिया, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकला सुवर्णपदक, तर अंशू मलिकला रौप्यपदक मिळाले. दीपकने पाकिस्तानच्या मुहम्मद इनाम याला हरवले, तर बजरंगने कॅनडाच्या लॅचलीन मॅक्नेलवर विजय मिळवला. साक्षीने कॅनडाच्या अॅना गोडिनेझ गोंझालेझचा पराभव केला. नायजेरियाच्या ओडूनायोकडून पराभूत झाल्याने अंशू मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दिव्या काकराननेदेखील 68 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. याशिवाय मोहित ग्रेवालनेही कांस्यपदक आपल्या नावावर केले.
बजरंग पुनियाची 'गोल्डन' हॅट्ट्रिक (CWG 2022)
भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत 65 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने कॅनडाच्या 21 वर्षीय लॅचलीन मॅक्नेलचा 9-2 असा पराभव केला. बजरंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे गोल्डमेडल आहे. त्याने 2018 मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतदेखील 65 किलो वजनी गटात 'सुवर्ण' कमाई केली होती. तर 2014 मध्ये ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत 61 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली होती.
65 किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियाने पहिल्या फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने पहिल्याच सत्रात 4 गुण मिळवत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर मॅक्नेलने दुसर्या डावात दोन गुण मिळवले. त्यानंतर बजरंग पुनियाने मॅक्नेलला रिंगच्या बाहेर ढकलत दोन गुण मिळवत पुन्हा आघाडी घेत 4 गुण मिळवले. बजरंग पुनियाने मॅक्लेनच्या पायावर सातत्याने आक्रमण केले. त्याने पुन्हा त्याला रिंगच्या बाहेर ढकलत एक गुण मिळवला. सामना संपता संपता बजरंगने दोन गुण मिळवत सामना 9-2 असा एकतर्फी जिंकला.
सुवर्ण'साक्षी' (CWG 2022)
रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती साक्षी मलिकने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत राष्ट्रकुल पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. तिने कॅनडाच्या अॅना गोडिनेझ गोंझालेझचा पराभव केला. पहिल्या फेरीत साक्षी 0-4 ने पिछाडीवर होती. मात्र, दुसर्या डावात साक्षीने पिन फॉल डाव टाकत थेट सुवर्णपदकालाच गवसणी घातली.
साक्षी मलिकने अॅनाविरुद्ध पहिल्यांदा आक्रमक डाव खेळण्याचा प्रयत्न केला. पाय पकडून अॅनाला खाली घेण्याचा प्रयत्न करताना साक्षीचा डाव तिच्यावरच उलटला आणि अॅनाने दोन गुण मिळवले. अॅनाने टेक डाऊन डाव खेळत पुन्हा एकदा दोन गुणांची कमाई केली. त्यामुळे पहिल्या सत्रात अॅना गोंझालेझने साक्षी मलिकवर 4 गुणांची आघाडी मिळवली. दुसर्या सत्रात मलिकने टेक डाऊनचे दोन गुण मिळवले. त्यानंतर तिने पिन फॉल डाव टाकत थेट सुवर्णपदक पटकावले.
दीपकने पाकिस्तानच्या इनामला लोळवले (CWG 2022)
कुस्तीपटू दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद इनामचा पराभव करत 'सुवर्ण'ला गवसणी घातली. 23 वर्षांच्या युवा दीपक पुनियाने इनामचा 3-0 असा पराभव केला.
दीपक पुनियाने अनुभवी इनामविरुद्ध पहिल्या फेरीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. दीपकने इनामला रिंगच्या बाहेर ढकलत गुणांचे खाते उघडले. त्यानंतर पॅसिव्ह पॉईंटच्या जोरावर गुणांची संख्या 2 वर नेली. पहिल्या फेरीत दीपक दोन गुणांनी आघाडीवर होता. त्याने पाकिस्तानच्या अनुभवी कुस्तीपटूविरुद्ध सातत्याने आक्रमक डाव खेळले.
दुसर्या सत्रात पाकिस्तानचा कुस्तीपटू मुहम्मद इनाम ग्रीपपासून पळत होता. दरम्यान, दीपकने इनामला रिंगच्या बाहेर ढकलत अजून एक गुण मिळवला. आघाडी 3-0 अशी झाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या इनामने बचावात्मक खेळ करत वेळ काढून शेवटच्या काही सेकंदात मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुनियाने आपली पकड कायम ठेवत सुवर्णपदक जिंकले.
अंशूला रौप्य
महिला फ्री स्टाईल कुस्तीच्या 57 किलो वजनी गटात भारताची कुस्तीपटू अंशू मलिकचा नायजेरियाच्या ओडूनायोने पराभव करत सुवर्णपदक पटकावले. अंशू मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, अंशू मलिकचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील पदार्पण आहे. अंशूने आपले सलग दोन सामने तांत्रिक सरसतेच्या जोरावर जिंकत फायनल गाठली होती. पहिल्या सत्रात नायजेरियाच्या ओडूनायोने दोन-दोन असे एकूण चार तांत्रिक गुण पटकावले. पहिल्याच सत्रात पिछाडीवर पडलेल्या अंशूने दुसर्या सत्रात मात्र मुसंडी मारत पहिल्यांदा 1 व त्यानंतर 2 असे एकूण तीन तांत्रिक गुण पटकावले. मात्र, नायजेरियाच्या ओडूनायोने याच सत्रात 3 गुण घेत सामना 7-3 असा जिंकला.