IND vs WI : मालिका विजय निश्चित करण्यास भारत सज्ज | पुढारी

IND vs WI : मालिका विजय निश्चित करण्यास भारत सज्ज

प्लोरिडा : वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील चौथा आणि पाचवा टी-20 सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार आहे. भारत सध्या मालिकेत 2-1 असा आघाडीवर आहे. आज (शनिवारी) मालिकेतील चौथा सामना जिंकून भारत मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेण्याच्या तयारीत असेल. मात्र, तिसर्‍या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माला फलंदाजी करताना दुखापत झाली होती. तो 11 धावांवर असताना त्याच्या पाठीचा स्नायू दुखावला होता. त्याला मैदानदेखील सोडावे लागले होते. तो चौथ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तो आता खेळण्यासाठी फिट झाला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरवर सर्वांची नजर असणार आहे. श्रेयस अय्यरला टी-20 सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. दुसर्‍या बाजूला दीपक हुडाने संधीचे सोने करत मधल्या फळीतील आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे. (IND vs WI)

आशिया कप 2022 साठी के. एल. राहुल आणि विराट कोहली संघात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला संघाच्या बाहेर बसावे लागेल. श्रेयस अय्यरने गेल्या तीन सामन्यांत 0, 11 आणि 24 धावा केल्या आहेत. त्याला वेगवान गोलंदाजांचा अखूड टप्प्याचा चेंडू खेळताना अडचणी येत आहेत.

आतापर्यंत या मालिकेत तीन सामने झाले आहेत. या तीन सामन्यांमध्ये भारताने दोन सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजला एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने जर हा चौथा सामना जिंकला, तर त्यांना मालिका विजय साकारता येऊ शकतो. भारताकडे मालिका जिंकण्यासाठी दोन संधी आहेत. चौथ्या सामन्यात जर भारताला विजय मिळवता आला नाही, तर पाचव्या सामन्यात विजय मिळवून त्यांना मालिका जिंकता येऊ शकते; पण जर हे दोन्ही सामने त्यांनी गमावले, तर वेस्ट इंडिजला मालिका जिंकता येणार आहे.

आज चौथा टी-20 (IND vs WI)

सामन्याची वेळ : रात्री 8 वाजता
थेट प्रक्षेपण : डी. डी. स्पोर्टस्-2

Back to top button