तेजस्विन शंकरची पदकापर्यंत उंच उडी | पुढारी

तेजस्विन शंकरची पदकापर्यंत उंच उडी

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था राष्ट्रकुल 2022 मध्ये ट्रॅक अँड फिल्ड प्रकारात भारताचे खाते उघडले. तेजस्विन शंकर याने उंच उडी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. 23 वर्षीय शंकरने देशासाठी 18 वे पदक जिंकले. राष्ट्रकुलमध्ये उंच उडीत भारताला पहिल्यांदाच पदक मिळाले आहे. तेजस्विन याने 2.22 मीटर उंच उडी मारली. त्याने सुरुवातीला 2.10 मीटर उंची सहज पार केली. परंतु, त्याचे चार प्रतिस्पर्धी 2.15 मीटर उंच उडी मारण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर शंकरनेही आधी 2.15 मी. आणि नंतर 2.19 मी. अशी उडी मारली. पुढच्या प्रयत्नात तो 2.22 मीटर उंच उडी मारण्यात यशस्वी ठरला. परंतु, 2.25 मीटर उंचीचा अडथळा पार करण्यात शंकर अपयशी ठरला. त्यामुळे सुवर्णपदकाचा दावेदार समजला जात असलेला शंकर पदकापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली.

बहामसचा डोनाल्ड थॉमस 2.25 मीटर उडी मारण्यात यशस्वी झाला नाही, त्यामुळे शंकरच्या नावापुढे कांस्यपदकाची नोंद झाली. डोनाल्ड थॉमस आणि इंग्लंडच्या जो क्‍लार्कने शंकरच्या बरोबरीने म्हणजे 2.22 मीटर उडी मारली होती. परंतु, त्यासाठी त्यांनी एकापेक्षा जास्त प्रयत्न केले होते. तर शंकरने पहिल्याच प्रयत्नात हे अंतर गाठले होते. त्यामुळे तो कांस्यपदकाचा मानकरी ठरला. शंकरने 2.28 मीटर उडीसाठी प्रयत्न करण्याचे टाळले. 2018 च्या गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत शंकर सहाव्या स्थानावर राहिला होता.

Back to top button