मिश्र बॅडमिंटनमध्ये भारताची रूपेरी कामगिरी | पुढारी

मिश्र बॅडमिंटनमध्ये भारताची रूपेरी कामगिरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील मिश्र सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात टीम इंडियाला मलेशियाकडून 3-1 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवाने राष्ट्रकुलमध्ये सलग दुसर्‍यांदा सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न मात्र भंगले. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने सुवर्णपदक जिंकले होते.

मलेशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला तेंग फोंग एरॉन चिया आणि वुई यिक सोह या मलेशियन जोडीकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय जोडीने हा सामना 21-18 आणि 21-15 असा गमावला. यामुळे मलेशियाला 1-0 अशी आघाडी मिळाली.

त्यानंतर पी.व्ही. सिंधूने दुसर्‍या सामन्यात भारताला विजय मिळवून देताना मलेशियाच्या जिन वेई गोहचा पराभव केला. सिंधूने हा सामना 22-20, 21-17 असा जिंकला. सिंधूच्या विजयामुळे भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. पुरुष एकेरीचा तिसरा सामना भारताचा किदाम्बी श्रीकांत व मलेशियाच्या योंग यांच्यात झाला. या लढतीत किदाम्बी श्रीकांतला 19-21, 21-6, 16-21 असे पराभूत व्हावे लागले. याबरोबरच मलेशियाला 2-1 अशी आघाडी मिळाली. त्यानंतर चौथ्या सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा मलेशियाच्या मुरलीधरन थिनाह आणि कूंक ली पियर्ली तान या जोडीने 18-21, 17-21 असा पराभव केला. या पराभवाबरोबरच मिश्र सांघिक स्पर्धेचा सामना भारताने 3-1 ने गमावला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Back to top button