CWG 2022 : ज्युदोत भारताची तुलिका मान फायनलमध्ये; पदक निश्चित | पुढारी

CWG 2022 : ज्युदोत भारताची तुलिका मान फायनलमध्ये; पदक निश्चित

बर्मिंगहॅम; पुढारी ऑनलाईन : येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा (CWG 2022) स्पर्धेत भारताची महिला ज्युदो खेळाडू तुलिका मानने फायनलमध्ये प्रवेश करत पदक निश्‍चित केले. तिने महिलांच्या 78 किलोवरील गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये तुलिकाने ऑस्ट्रेलियाच्या सिडनी अँड्र्यूज हिचा 10-1 अशा एकतर्फी धुव्वा उडविला. तुलिकाने उपांत्यपूर्व फेरीतही मॉरिशसच्या डरहोनचा एकतर्फी पराभव केला होता. तुलिकाचा फॉर्म पाहता तिचे स्पर्धेतील सुवर्णपदक निश्‍चित असल्याचे मानले जात आहे.

22 व्या राष्ट्रकुल क्रीडा (CWG 2022) स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवली. बॅडमिंटनमधील मिश्र सांघिक प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले. वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. तसेच महिला ज्युडो खेळाडू तुलिना मानने फायनलमध्ये प्रवेश करत देशासाठी पदक निश्‍चित केले. तर, महिला बॉक्सर नीतू घनघसन व पुरुष बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दिन यांनीही पदके निश्‍चित केली आहेत. याशिवाय भारतीय महिला संघानेही सेमीफायनलध्ये धडक मारून पदकाच्या आशा पल्लवित केल्या.

बॉक्सिंग : भारताची दोन पदके निश्‍चित (CWG 2022) 

भारताची महिला बॉक्सर नीतू घनघसने बुधवारी भारतासाठी एक पदक निश्‍चित केले. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तिने उत्तर आयर्लंडच्या निकोल क्‍लॉयडचा पराभव केला. 48 किलो वजनी गटात 21 वर्षीय नीतूने सुरुवातीपासूनच क्‍लॉयडवर शानदार विजय मिळवला. दरम्यान, पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात भारताने बुधवारी आणखी एक पदक निश्‍चित केले. मोहम्मदने हे पदक निश्‍चित करताना नामिबियाच्या बॉक्सरला एकतर्फी पराभूत केले. मोहम्मदने या सामन्यात नामिबियाच्या ट्राईअगेन मॉर्निंग डेवोले याचा 4-1 अशा गुणांनी धुव्वा उडविला.

Back to top button