IND vs WI : तिसर्‍या सामन्यात भारत विजयी | पुढारी

IND vs WI : तिसर्‍या सामन्यात भारत विजयी

सेंट किटस् : वृत्तसंस्था : सूर्यकुमार यादवने केलेल्या झुंजार 76 धावांच्या जोरावर (IND vs WI) भारताने वेस्ट इंडिजवर तिसर्‍या टी-20 सामन्यात 7 विकेटस्नी विजय मिळवून मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.

वेस्ट इंडिजने कायले मेयर्सच्या दणकेबाज 73 धावा आणि त्यानंतर शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना वेस्ट इंडिजने 5 बाद 164 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली होती. भारताने हे आव्हान एक षटक राखून पूर्ण केले. सूर्याच्या अर्धशतकाशिवाय श्रेयस अय्यर (24)आणि ऋषभ पंत (नाबाद 33) यांनी विजयात हातभार लावला. रोहित शर्मा 11 धावा करून जखमी निवृत्त झाला.जोसेफला चौकार मारताना त्याच्या पाठीत चमक भरल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कायले मेयर्स व ब्रेंडन किंग्स या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासून प्रहार केला. किंग्सने 20 चेंडूंत 20 धावा करताना तीन चौकार खेचले आणि हार्दिक पंड्याने त्याची विकेट मिळवून दिली. वेस्ट इंडिजला 57 धावांवर पहिला धक्का बसला.

कायले मेयर्सने आर. अश्विनचा चेंडू षटकार खेचून मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मेयर्स व निकोलस पूरन यांची 50 धावांची भागीदारी भुवनेश्वर कुमारने संपुष्टात आणली. विंडीजचा कर्णधार पूरन 22 धावांवर झेलबाद झाला. भुवीने 50 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांसह 73 धावा करणार्‍या मेयर्सला बाद केले. या विकेटसह भारताकडून जलदगती गोलंदाजांमध्ये टी-20 मध्ये सर्वाधिक बळींचा विक्रम त्याने नावावर केला. यजुवेंद्र चहल 79 विकेटस्सह आघाडीवर आहे, तर भुवीच्या नावावर 73 विकेटस् आहेत. आवेश पुन्हा एकदा महागडा ठरला आणि शिमरोन हेटमायरने 19 व्या षटकात 17 धावा चोपल्या. अर्शदीप सिंगने सलग दोन चौकार खेचणार्‍या रोव्हमन पॉवेलला तिसर्‍या चेंडूवर बाद केले. पॉवेलने 14 चेंडूंत 23 धावा केल्या. हेटमायरही 12 चेंडूंत 20 धावा करून धावबाद झाला. विंडीजने 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या.

हार्दिकचा विक्रम (IND vs WI)

आंतरराष्ट्रीय टी-20 त 500+ धावा अन् 50 विकेटस् घेणारा हार्दिक पंड्या हा भारताचा पहिलाच, तर जगातला दहावा अष्टपैलू खेळाडू ठरला. यापूर्वी शाकिब अल हुसैन, शाहीद आफ्रिदी, ड्वेन ब्राव्हो, जॉर्ज डॉक्रेल, मोहम्मद नबी, मोहम्मद हाफिज, केव्हिन ओ ब्रायन, थिसारा परेरा यांनी हा पराक्रम केला आहे.

Back to top button