अवघ्या एक किलोने हुकले अजय सिंहचे कांस्यपदक | पुढारी

अवघ्या एक किलोने हुकले अजय सिंहचे कांस्यपदक

भारताच्या अजय सिंहचे वेटलिफ्टिंगमध्ये 81 किलो वजनी गटात पदक हुकले आहे. अजय सिंहने जर पदक जिंकले असते तर भारताला वेटलिफ्टिंगमधील 7 वे पदक जिंकता आले असते. सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुगा आणि अचिंत शुली यांनी सुवर्णपदके पटकावली आहेत.

अजय सिंगने स्नॅच प्रकारात पहिल्याच प्रयत्नात 137 किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. त्याने दुसर्‍या प्रयत्नात 140 किलो वजन उचलून पदकाच्या शर्यतीत आपली प्रबळ दावेदारी सादर केली. त्यानंतर त्याने तिसर्‍या प्रयत्नात 143 किलो वजन उचलून आपली पदकाची शक्यता अजून बळकट केली. क्लीन अँड जर्क प्रकारात अजय सिंहने पहिल्या प्रयत्नात 172 किलो वजन उचलत एकूण 315 किलो वजन उचलले. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात त्याने 176 किलो वजन उचलून एकूण उचलले वजन 319 किलोपर्यंत नेले. मात्र, इंग्लंडच्या मुरीने 178 किलो वजन उचलून आपली आघाडी कायम ठेवली. अजय दुसर्‍या क्रमांकावर राहिला. मुरीने 181 किलो वजन उचलून गेम रेकॉर्ड तयार केले. याचबरोबर सुवर्णावर देखील मोहर उमटवली. मात्र, तिसर्‍या प्रयत्नात अजय सिंहला तिसर्‍या प्रयत्नात 180 किलो वजन उचलण्यात अपयश आले. तो पदकाच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर राहिला. त्याचे कांस्यपदक अवघ्या एक किलोने हुकले. सुवर्णपदक विजेत्या ख्रिस मुरीने एकूण 325 किलो वजन उचलून गेम रेकॉर्ड केले. तर कांस्यपदक जिंकणार्‍या कॅनडाच्या निकोलस वॅकहोनने एकूण 320 किले वजन उचलले. अजय सिंहने एकूण 319 किलो वजन उचलले होते. त्यामुळे अजय सिंहचे कांस्यपदक अवघ्या एका किलोने हुकले.

Back to top button