कोहलीच्या मागणीवरूनच झिम्बाब्वे दौर्‍यात विश्रांती | पुढारी

कोहलीच्या मागणीवरूनच झिम्बाब्वे दौर्‍यात विश्रांती

नवी दिल्‍ली :  शनिवारी (30 जुलै) झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. या मालिकेत विराट कोहली खेळेल, अशी चर्चा होती. मात्र, निवडलेल्या संघामध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर केव्हा पुनरागमन करणार? अशा चर्चांना उधाण आले आहे.

या दरम्यान, विराटने आपल्या पुनरागमनाबाबत स्वत: निवड समितीशी चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज विराट कोहली खराब फॉर्मशी झुंज देत आहे. अशातच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका आणि वेस्ट इंडिज दौर्‍यात त्याला विश्रांती देण्यात आली. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघातही त्याचे नाव नाही. त्यामुळे विराट कोहलीला जाणीवपूर्वक वगळल्याची चर्चा सुरू झाली.

मात्र, पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीने स्वत: झिम्बाब्वे दौर्‍यासाठी सुट्टी मागितली आहे. त्यानंतर होणार्‍या आशिया चषकापासून तो भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्यानंतर सातत्याने खेळणार असल्याचे सांगितले आहे. चाहत्यांना कोहलीच्या फॉर्मची चिंता आहे. चाहत्यांचे आणि काही क्रिकेटपंडितांचे असे मत आहे की, कोहलीने सतत खेळले पाहिजे. जेणेकरून तो आपला गमावलेला फॉर्म परत मिळवू शकेल.

Back to top button