नीरज चोप्रा म्हणाला, तुमच्या अजेंड्यासाठी माझा वापर करु नका!

नीरज चोप्रा

पानीपत : पुढारी ऑनलाईन

टोकियो ऑलिम्पिकमध्ये गाेल्‍डन बाॅय  नीरज चोप्रा हा आक्षेपार्ह विधाने करणार्‍यांवर चांगलाच भडकला आहे. त्याने आपल्या सोशल अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करुन आपली बाजू मांडली. नीरज चोप्राने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ऑलिम्पिक फायनलमध्ये आपण आपला भाला शोधत होतो तो भाला पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याच्याकडे होता असे सांगितले होते. यावरुन अनेकांनी पराचा कावळा केला, असे नीरजने सुनावले आहे.

नीरज चोप्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडओ पोस्ट केला आहे. यामध्‍ये ताे म्हणतो की, पाकिस्तानच्या भालाफेकपटूने माझा भाला घेणे यात काहीच गैर नाही. हे नियमानुसारच घडले होते.  याचा एवढा मोठा मुद्दा करण्याची गरज नव्हती.

नीरज चोप्रा पुढे म्हणाला, ‘मी सर्वांना विनंती करतो की, कृपा करुन माझा आणि माझ्या वक्तव्याचा तुमच्या विशिष्ट अजेंड्यासाठी आणि भ्रम पसरवण्यासाठी वापर करु नका. खेळ आम्हाला एकत्र येण्यास शिकवतो. माझ्या नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यावर अनेकांनी ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिली ते पाहून माझी निराशा झाली आहे.’

काय होते नीरजचे वक्तव्य?

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करत नीरज चोप्राने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर त्याचे देशभरातून कौतुक होऊ लागले. अनेक माध्यमांना त्याने मुलाखत दिली. नुकतीच त्‍याने एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत त्याने सांगितले हाेते की, ‘ज्यावेळी अंतिम फेरी सुरु होणार होती त्यावेळी मी माझा भाला शोधत होतो. मला माझा भाला मिळत नव्हता. अचानक मला तो भाला पाकिस्‍तानचा खेळाडू अर्शद नदीम याच्या हातात दिसला. त्यानंतर मी त्याला बोललो की भावा मला हा भाला दे हा भाला माझा आहे. मला हा भाला टाकायचा आहे. त्याने मला माझा भाला परत दिला. तुम्हाला जाणवले असेल की मी माझा पहिला भालाफेक प्रयत्न करत असताना थोडा गडबडीत होतो.’

नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात आपली कामगिरी सुधारत ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. या कामगिरीच्या जोरावरच नीरज चोप्रा सुवर्ण पदकाला गवसणी घालू शकला.

अनेकांना भालाफेकीत जर्मनीचा जोहान्स व्हेट्टर दमदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकेल, असा अंदाज होता.

मात्र त्याला अंतिम फेरीत फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.

त्याला अंतिम फेरीतील अंतिम आठ स्पर्धकांमध्येही जागा मिळवता आली नव्हती.

पाहा व्हिडिओ : माझ्या फेसबुक अकाऊंडवरुन अश्लील फोटो शेअर केले जात आहेत

Exit mobile version