IND vs WI : भारताचे वेस्ट इंडिजला 309 धावांचे आव्हान | पुढारी

IND vs WI : भारताचे वेस्ट इंडिजला 309 धावांचे आव्हान

पोर्ट ऑफ स्पेन : वृत्तसंस्था : कर्णधारपद भूषवण्याचा मान मिळवलेल्या शिखर धवन याचे हुकलेले शतक आणि त्याच्यासोबत शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतके याच्या जोरावर (IND vs WI) भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात 50 षटकांत 7 बाद 308 धावा केल्या.

धवन, गिल आणि श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्यांची फलंदाजी पाहून टीम इंडिया आज 400 पार धावा सहज उभारेल, असेच चित्र दिसत होते. पण, वेस्ट इंडिजने चांगले कमबॅक केले. निकोलस पूरनने सुरेख रन आऊट करून गिलला बाद केले आणि त्यानंतर अय्यरचा अफलातून कॅच घेत सामना फिरवला. धवनही शतकापासून 3 धावांनी वंचित राहिला. विंडीजच्या गोलंदाजांनी अखेरच्या 17 षटकांत चांगली गोलंदाजी केली.

पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या शुभमन गिल व शिखर धवन यांनी 119 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी 18 व्या षटकात संपुष्टात आली. विंडीज कर्णधार निकोलस पूरनच्या अचूक थ्रोने गिलला धावबाद केले आणि त्याला 64 धावांवर माघारी जावे लागले. धवन व श्रेयस यांनी आक्रमक खेळ केला. धवनला शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी परतावे लागले. गुदाकेश मोतीएने विंडीजला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्याच्या फिरकीवर कट मारण्याचा प्रयत्न धवनने केला अन् बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या शामर्ह ब्रूक्सने अफलातून कॅच घेतला. धवन 99 चेंडूंत 10 चौकार व 3 षटकारांसह 97 धावांवर माघारी परतला. (IND vs WI)

गुदाकेश मोतीएनेच श्रेयसची विकेट मिळवून दिली. कव्हरवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत झेपावत एका हाताने चेंडू टिपला. श्रेयस 57 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 54 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव (13), संजू सॅमसन (12) झटपट माघारी परतले आणि भारताच्या धावगतीचा वेग संथ होत गेला. 1 बाद 213 वरून पुढील 39 धावांत भारताने 4 फलंदाज गमावले. रोमारिओ शेफर्डने भारताला पाचवा धक्‍का दिला. दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करून संघाला 300 च्या पार नेले. अल्झारी जोसेफने 49 व्या षटकात अक्षर (21) व दीपक (27) या दोघांचाही त्रिफळा उडवला. भारताला 7 बाद 308 धावा करता आल्या. 35 षटकांत 2 बाद 225 अशा धावा भारताने केल्या होत्या, परंतु पुढील 15 षटकांत 83 धावांत 5 फलंदाज गमावले.

भारत : 50 षटकांत 7 बाद 308 धावा. (शिखर धवन 97, शुभमन गिल 64, श्रेयस अय्यर 54. गुदाकेश मोतीए 2/54, अल्झारी जोसेफ 2/61.

रवींद्र जडेजा दोन सामन्यातून बाहेर

पोर्ट ऑफ स्पेन : वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका शुक्रवारपासून सुरू झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा खेळू शकलेला नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जडेजा पहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. तिसर्‍या सामन्यातही त्याच्या खेळण्याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून तो बाहेर पडला आहे. वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येईल. या दौर्‍यासाठी रवींद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले होते. तो जखमी झाल्यामुळे बीसीसीआयने श्रेयस अय्यरला उपकर्णधार केले आहे.

Back to top button