कोहली ‘सेना’ देशात भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार | पुढारी

कोहली ‘सेना’ देशात भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार

हेडिंग्ले; वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंडदरम्यान बुधवारी तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी लॉर्डस्वर झालेल्या लढतीत भारताने इंग्लंड संघावर 151 धावांनी विजय मिळवला. लीडस्मध्येदेखील विराटचा प्रयत्न हा फॉर्म कायम ठेवत मालिकेत मजबूत आघाडी मिळवण्याचा असेल. लॉर्डस्मध्ये मिळवलेल्या विजयानंतर विराट कोहली दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना देश) मध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चार देशांत 20 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये संघाला पाच सामन्यांत विजय मिळवता आला. तर 12 सामन्यांत संघाला पराभूत व्हावे लागले व तीन सामने ड्रॉ राहिले.

एका देशाविरुद्ध सर्वाधिक विजय

विराटनंतर दुसर्‍या स्थानी महेंद्रसिंग धोनी आहे.त्याने 23 सामन्यांत भारताला तीन विजय मिळवून दिले. 14 सामन्यांत संघाला पराभूत व्हावे लागले, तर सहा सामने ड्रॉ राहिले. इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनला. धोनी आणि विराट या मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर 8-8 कसोटी सामने जिंकत बरोबरीत होते; पण लॉर्डस्मध्ये मिळवलेल्या विजयानंतर विराट हा धोनीच्या पुढे निघाला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध नऊ सामने जिंकले आहेत.

द.आफ्रिकेविरुद्धदेखील यशस्वी

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात सामने जिंकले आहेत. याशिवाय कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सहा सामने जिंकले आहेत. कोहली भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारदेखील आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 63 कसोटींत 37 सामने जिंकले आहेत.

विराटने क्लाईव्ह लॉयड यांना टाकले मागे

विराटने एकूण विजयाच्या बाबतीत वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉयडनादेखील मागे सोडले आहे. लॉर्डस् येथील विजयानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणार्‍यांच्या यादीत विराट हा चौथ्या स्थानी आहे. लॉयड यांनी 74 कसोटी सामन्यांत वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले आणि 36 कसोटी सामन्यांत लॉयड यांनी विजय मिळवला. कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथच्या नावे आहे. त्याने 109 कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आणि 53 कसोटी सामन्यांत विजय मिळवला.

Back to top button