
इंग्लंड मधील लंडनच्या ओव्हल मैदानावर 23 ऑगस्ट 1971 रोजी अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडवर 4 विकेटसने ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर सातार्यात क्रिकेटप्रेमींनी विजयोत्सव साजरा केला. तब्बल 50 वर्षानंतर क्रिकेटप्रेमींनी या आठवणी जागवल्या.
1932 ते 1967 या काळात भारताने पाचवेळा इंग्लंड दौरे केले. पण भारताला विजयापासून वंचित रहावे लागले. 1971 साली मात्र भारताने पहिलावाहिला विजय मिळवून कसोटी मालिकाही जिंकली.
सातार्यातले क्रिकेटप्रेमी जगन्नाथ मुळे यांनी या आठवणी सांगताना सातार्यातील विजयोत्सवाचीही स्मृतीही जागवली. तीन कसोटीपैकी दोन सामने अनिर्णित राहिल्यानंतर ओव्हलवर तिसरा सामना झाला. इंग्लंडने पहिल्या डावात 355 तर भारताने 284 धावा केल्या. पहिल्या डावातील 71 धावांची आघाडी मिळाल्यानंतर इंग्लंडचा दुसरा डाव फक्त 101 धावांवर आटोपला. लेगस्पिनर चंद्रशेखरने जादुई स्पेल टाकत 38 धावात 6 फलंदाजांना तंबूत पाठवले. भारताला विजयासाठी 173 धावा करायच्या होत्या. कर्णधार वाडेकर 45, इंजिनिअर 40, विश्वनाथ 33 यांच्या दमदार फलंदाजीनंतर फरूख इंजिनिअरने फटकेबाजी केली तर अबीद अलीने विजयी चौकार लगावत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
या विजयाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सातारकर क्रिकेटप्रेमींना लाभलं. तो क्षण मात्र अलौकिक होता. तो जमाना रेडिओचा होता. रेडिओ कॉमेंट्री ऐकतच सारे चित्र समोर उभे रहायचे. सातारा जिल्हा क्रिकेट असो.चे तत्कालिन सचिव सुरेश महाजनी मोती चौकात रहात असत. त्यांनी कॉमेंट्री ऐकण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली. त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी स्कोअरबोर्ड बसवला व भारतीय खेळाडूंच्या नावाच्या छोट्या पाट्या बनवल्या. रेडिओ कॉमेट्री ऐकून त्यानुसार धावफलक लावण्याचे काम मुळे यांनी केली. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्या या सामन्यात भारताच्या विक्रमी विजयाची चाहुल लागली तशी रस्त्यावरची गर्दी वाढू लागली. वाहतुकीचा प्रश्नही निर्माण झाला.
त्यावेळी तत्कालिन पोलिस निरीक्षक दोडमनी, पोलिस अधीक्षक पार्थसारथी यांनी गर्दी पांगवली व वाहतूक नियंत्रित केली. संध्याकाळी 7.30 च्या सुमारास भारताने सामना जिंकताच मोती चौकात क्रिकेटप्रेमींनी विजयोत्सव साजरा केला. या सोहळ्यात महाजनी, व्ही. के. कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी,सुधीर माजगावकर, बाजी डिंगणकर, मामा महाजन, सुरेश रावखंडे, शरद महाजनी, श्रोत्री, क्रिकेटप्रेमी सहभागी झाले होते.