राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेपूर्वीच भारताला धक्का; डोप चाचणीमध्ये दोन महिला खेळाडू ठरल्या दोषी | पुढारी

राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेपूर्वीच भारताला धक्का; डोप चाचणीमध्ये दोन महिला खेळाडू ठरल्या दोषी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास अवघ्या एक आठवड्याचा अवधी बाकी असतानाच भारताला दुहेरी धक्का बसला आहे. डोप चाचणीत भारताच्या दोन महिला खेळाडू दोषी आढळल्या आहेत. यामध्ये मुख्य धावक एस. धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीतील खेळाडू ऐश्वर्या बाबू यांचा समावेश आहे.

डोप चाचणीत दोषी आढळल्याने एस. धनलक्ष्मी आता राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही. तर, तिहेरी उडीतील राष्ट्रीय विक्रमवीर ऐश्वर्या बाबूने बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे उघड झाले आहे. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्सच्या अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने घेतलेल्या डोप चाचणीत धनलक्ष्मी दोषी आढळली. चाचणीसाठी घेण्यात आलेल्या धनलक्ष्मीच्या नमुन्यात बंदी घालण्यात आलेले एनाबॉलिक स्टेरॉईड आढळले. यामुळे धनलक्ष्मीला राष्ट्रकूलमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यात आले.

एका वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एआयईयूच्या वतीने घेण्यात आलेल्या डोप चाचणीत धनलक्ष्मी पॉझिटिव्ह आढळली आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत ती महिलांच्या 100 बाय 4 मीटर रिले स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार होती. मात्र, डोप चाचणीत दोषी आढळल्याने धनलक्ष्मी आता या राष्ट्रकूल स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. 24 वर्षीय ऐश्वर्या बाबूचे नमुने नाडा अधिकार्‍यांनी चेन्नईच्या विमानतळावर घेतले होते. या नमुन्यांची चाचणी घेतले होते. त्यात बंदी घालण्यात आलेल्या उत्तेजकांचा अंश सापडल्याचे स्पष्ट झाले. अशा प्रकारे राष्ट्रकूल स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताला डोपच्या रूपाने दोन धक्के बसले आहेत.

Back to top button