सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करा, पदके मिळतीलच : पंतप्रधान मोदी | पुढारी

सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करा, पदके मिळतीलच : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली/पानिपत; वृत्तसंस्था : बर्मिंघममध्ये येत्या 28 जुलैपासून राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय चमू रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी चर्चा केली आणि पूर्ण ताकदीनीशी मन लावून कोणत्याही दबावाविना खेळण्याचा मंत्र दिला.

28 जुलै ते 8 ऑगस्ट यादरम्यान होणार्‍या या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्सच्या 19 प्रकारांत भारतीय संघ सहभागी होणार आहे. काही भारतीय खेळाडू यापूर्वीच बर्मिंघमला पोहोचले आहेत. दरम्यान, खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोदी यांनी त्यांच्याशी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जे खेळाडू पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, केवळ मैदान बदलले असून आपले लक्ष्य अथवा आपला निर्धार बदललेला नाही. मोदी यांनी यावेळी स्टिपलचेसपटू अविनाश साबळे, वेटलिफ्टर अंचित शिऊले, बॅडमिंटनपटू त्रिसा जॉली, हॉकीपटू सलिमा टेटे, पॅरा अ‍ॅथलिट शर्मिला यांच्याशी चर्चा करत त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

मोदी पुढे म्हणाले की, तुम्ही सर्वांनी टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. आमच्या दोन्ही हॉकी संघांनी टोकिओत अत्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. या दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. सर्वांनी जर सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले तर कोणत्याही परिस्थितीत देशाला पदके मिळणारच. तसेच तुम्ही सर्वजण सध्या भारतीय खेळाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहात. कारण आज तुमच्याजवळ सर्व सुविधा उपलब्ध आहेत. देशात खेळाचे अत्यंत चांगले वातावरण आहे. यामुळे तुमचे चांगले प्रदर्शन भविष्यातील खेळाडूंना प्रोत्साहीत करणारे ठरणार आहे. ज्यावेळी तुम्ही सर्वजण मायदेशी परताल, तेव्हा आम्ही सर्वजण एकत्रपणे यश साजरे करूया.

भारताचा जंबो संघ

राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचा 322 सदस्यांचा संघ सहभागी होत आहे. यामध्ये 215 खेळाडू आणि 107 स्टाफ व प्रशिक्षकांचा समावेश आहे. यामधील 101 खेळाडू वैयक्तिक प्रकारात भाग घेतील. याशिवाय महिला आणि पुरुष हॉकी संघाबरोबरच भारताचा महिला क्रिकेट संघही सहभागी होणार आहे. भारतीय चमूचे नेतृत्व टोकिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा करणार आहे. गेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय संघ एकूण 66 पदके पटकावत तिसर्‍या स्थानी राहिला होता.

Back to top button