सुटणारे झेल भारतीय संघापुढील आव्हान | पुढारी

सुटणारे झेल भारतीय संघापुढील आव्हान

भारतीय क्रिकेट संघ एक महिन्यापासून इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे. यामध्ये गेल्यावर्षी स्थगित झालेला कसोटी सामना खेळवण्यात आला. त्याच्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध युवा संघाने दोन टी-20 सामने खेळले. कसोटीतील पराभवानंतर भारताने टी-20 मालिक 2-1 ने जिंकली. भारतासाठी हा दौरा आतापर्यंत संमिश्र असा ठरला असला तरी विश्वचषकासाठी तयारी करीत असताना एक फार मोठी समस्या भारताला सतावत आहे, ती म्हणजे सुटणार्‍या झेलांची. ‘कॅचेस विन मॅचेस’ असे म्हंटले जाते; परंतु भारतीय खेळाडूंनी इंग्लंड दौर्‍यात सोडलेले झेल हा चिंतेचा विषय ठरला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांना पहिल्या डावात तीन जीवदान मिळालीत. दुसर्‍या डावात जॉनी बेअरस्टोचे दोन झेल सुटले. याचा परिणाम असा झाला की बेअरस्टोने तुफानी शतकी खेळी करून सामना इंग्लंडला जिंकून दिला. त्याचे झेल पकडले गेले असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. त्यानंतर पहिल्या टी-20 सामन्यात तर कमालीचा गचाळपणा झाला. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी सहा झेल सोडले. यामध्ये तीन झेल एकट्या दिनेश कार्तिकने सोडले. दुसर्‍या टी-20 सामन्यात एक आणि तिसर्‍या सामन्यात दोन झेल भारतीयांनी सोडले.

यात विराटने लिव्हिंगस्टोनचा सोडलेला झेल चांगलाच महागात पडला. पहिल्या वन-डे मालिकेत भारताने दहा विकेटस्नी मोठा विजय मिळवला; परंतु यातही झेल सुटलेच. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने मोईन अलीला जीवदान दिले. दुसर्‍या सामन्यात 41 धावा करणारा डेव्हिड विलीला एका धावेवर असताना हार्दिक पंड्याच्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने जीवदान दिले. इंग्लंड दौर्‍यात सहा सामन्यांत भारतीय क्षेत्ररक्षकांनी आतापर्यंत 17 झेल सोडले आहेत. दोन सामन्यांत सुटलेल्या झेलांमुळे सामने गमवावे लागले आहेत.

यावर्षी आशिया चषक होईल आणि त्यानंतर वर्ल्डकप होणार आहे; परंतु ज्याप्रमाणे झेल सुटत आहेत, ते पाहता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कर्णधार रोहित शर्मा यांची डोकेदुखी वाढली आहे, तर फिल्डिंग कोच टी. दिलीप यांची जबाबदारी वाढली आहे. भारताची गणना अजूनही उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये केली जाते. भारताकडे रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या यांच्यासारखे वर्ल्डक्लास फिल्डर आहेत; परंतु हा लौकीक कायम राखायचा असेल तर संघातील इतर खेळाडूंनी आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे.

Back to top button