रवींद्र जडेजा सीएसकेशी सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात | पुढारी

रवींद्र जडेजा सीएसकेशी सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात

लंडन ; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मध्यंतरानंतर रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जडेजा याने तर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आयपीएल 2021 व आयपीएल 2022 मधील चेन्नई सुपर किंग्जसंदर्भातील सर्व पोस्ट डिलीट केल्या. त्यामुळे आता जडेजा सीएसकेला सोडचिठ्ठी देऊन आयपीएल 2023 मध्ये दुसर्‍याच संघाकडून खेळताना दिसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण, सीएसकेच्या अधिकार्‍यांनी ‘ऑल इज वेल’ म्हणत वेळ मारून नेली आहे.

आयपीएल 2022 ला सुरुवात होण्याआधी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. साहजिकच संघातील अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजा याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. पण, सीएसकेचा खालावलेला ग्राफ पाहून संघ व्यवस्थापनाने पुन्हा ही जबाबदारी धोनीला घेण्यास सांगितली. त्यावेळी जडेजावर कर्णधारपदाचे नेतृत्व जाणवत असल्याचे धोनीने सांगितले. पण, त्यानंतर रवींद्र जडेजा व सीएसके यांच्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने तर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आयपीएल 2021 व आयपीएल 2022 मधील चेन्नई सुपर किंग्जसंदर्भातील सर्व पोस्ट डिलीट केल्या. त्यामुळे आता जडेजा सीएसकेला सोडचिठ्ठी देऊन आयपीएल 2023 मध्ये दुसर्‍याच संघाकडून खेळताना दिसेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. याआधीही अशी चर्चा रंगली, परंतु सीएसके अधिकार्‍यांकडून त्याला फार महत्त्व दिले गेले नाही. मात्र, यावेळी सीएसकेकडून जडेजाच्या सोशल अकाऊंटवरून सीएसकेसंदर्भातील पोस्ट डिलीट करण्यावर प्रतिक्रिया आली आहे.

रवींद्र जडेजा 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात दाखल झाला. दहा वर्षांच्या प्रवासात जडेजाने सीएकेसोबत दोन आयपीएल विजेतेपदे जिंकली. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावापूर्वी जडेजाला फ्रँचायझीने 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. जडेजाने आयपीएलमध्ये 210 सामन्यांत 2502 धावा व 132 विकेटस् घेतल्या आहेत.

जडेजाच्या सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करण्यावर सीएसके अधिकारी म्हणाले, “तो त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे त्याबाबत आम्हाला फार काही माहीत नाही. पण, ऑल इज वेल.. सर्वकाही ठीक आहे. काहीच चुकीचे झालेले नाही.”

Back to top button