कुस्तीगीर परिषदेवर प्रशासक नियुक्‍त | पुढारी

कुस्तीगीर परिषदेवर प्रशासक नियुक्‍त

पुणे : पुढारी वृत्तसेवा भारतीय कुस्ती संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली होती. या बरखास्तीच्या निर्णयानंतर संघाच्या वतीने आता तीन सदस्यांची नियुक्‍ती प्रशासक म्हणून जाहीर केली असून आता परिषदेवर प्रशासक असणार आहे.

भारतीय कुस्ती संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रबरोबरच कर्नाटक आणि हरियाणा संघटनेवरही बरखास्तीची कारवाई करण्यात आली होती. या तीनही असोसिएशनवर तीन सदस्यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील कुस्ती परिषदेवर नेमण्यात आलेल्या समितीवर भारतीय कुस्ती संघाचे सहसचिव संजय कुमार सिंग यांची अध्यक्ष, संघाचे खजिनदार एस. पी. देशवाल यांची निमंत्रक म्हणून तर संघाचे सहसचिव आदित्य प्रताप सिंग यांची सदस्य म्हणून नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. यापुढील परिषदेचा सर्व कारभार प्रशासकामार्फतच होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन शरण सिंग यांनी पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button