न्यूझीलंड : महिला क्रिकेटपटूंना मिळणार पुरुषांइतकेच वेतन | पुढारी

न्यूझीलंड : महिला क्रिकेटपटूंना मिळणार पुरुषांइतकेच वेतन

नवी दिल्ली वृत्तसंस्था : स्त्री-पुरुषांमधील लैंगिक विषमता पूर्णपणे नाहीशी झालेली नसून त्यांच्या वेतनातही हा फरक दिसून येतो. क्रीडाविश्वही त्याला अपवाद नाही. मात्र, जगभरात हा फरक दूर करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली असून, पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतन जाहीर केले आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाच वर्षांच्या कराराची घोषणा केली आहे. यामध्ये महिला क्रिकेटपटूंनाही आंतरराष्ट्रीय आणि उच्चस्तरीय देशांतर्गत सामन्यांसाठी पुरुष खेळाडूंइतकेच मानधन मिळेल, असे बोर्डाने जाहीर केले आहे. यासाठी मंडळाने ऐतिहासिक पाच वर्षांचा करार जाहीर केला असून यानुसार, न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंना आणि देशांतर्गत महिला खेळाडूंना एकदिवसीय, टी-20 आंतरराष्ट्रीय, फोर्ड ट्रॉफी आणि सुपर स्मॅश स्तरासह सर्व फॉरमॅट आणि स्पर्धांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने मॅच फी मिळेल.

तसेच, करारानुसार देशांतर्गत करार मिळवणार्‍या महिला खेळाडूंची संख्या 54 वरून 72 पर्यंत वाढली, तर पुरुष खेळाडूंना अधिक सामने खेळण्यासाठी आणि प्रशिक्षण आणि खेळण्यात अधिक वेळ घालवण्यासाठी जास्त राखून ठेवणारी रक्कम मिळेल. दरम्यान, न्यूझीलंड महिला संघाची कर्णधार सोफी डीव्हाईनने हा करार महिला क्रिकेटसाठी गेम चेंजर असल्याचे म्हटले आहे.

न्यूझीलंड पुरुष संघाचा कर्णधार केन विल्यम्सन म्हणाला की, खेळासाठी हा रोमांचक काळ आहे. आमच्या आधी खेळलेल्या खेळाडूंचा वारसा चालू ठेवणे सध्याच्या खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत आगामी खेळाडूंना पुरुष आणि महिला अशा सर्वच स्तरांतून साथ देणे गरजेचे आहे. हा करार हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची मॅच फी

  • कोटी सामना : 10,250 डॉलर
  • एकदिवसीय सामने : 4,000 डॉलर
  • टी-20 आंतरराष्ट्रीय सामने : 2,500 डॉलर
  • प्लंकेट शिल्ड : 1,750 डॉलर
  • फोर्ड ट्रॉफी : 800 डॉलर
  • सुपर स्मॅश मॅच : 575 डॉलर

हेही वाचा

Back to top button