IND vs ENG 5th Test : इंग्लंडचे पारडे जड | पुढारी

IND vs ENG 5th Test : इंग्लंडचे पारडे जड

बर्मिंगहम : वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 5th Test) यांच्यातील पाचवा कसोटी आता रंगतदार झाला असून सकाळी भारताचे पारडे जड असताना दिवस संपता संपता सामना इंग्लंडकडे झुकला होता. भारताने इंग्लंडला विजयासाठी 378 धावांचे आव्हान दिले होते. यात भारताचा विजय निश्चित मानला जात होता, परंतु इंग्लिश फलंदाजांनी दुसर्‍या डावात जोरदार प्रतिकार करीत चौथ्या दिवसअखेरीस 3 बाद 259 धावा करीत भक्कम स्थिती प्राप्त केली आहे. ज्यो रूट (76) आणि जॉनी बेअरस्टो (72) या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 150 धावांची अभेद्य भागीदारी केली. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची आवश्यकता असून त्यांच्या 7 विकेटस् हातात आहेत. भारताला हा सामना आणि मालिका जिंकायची असेल तर 118 धावांत 7 विकेट घ्याव्या लागतील.

सोमवारी भारताने आपला दुसरा डाव 3 बाद 125 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. चेतेश्वर पुजारा 66 धावांवर ब्रॉडच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत या दोघांनी भारताची आघाडी 300 पार नेली. दरम्यान, पंतने 86 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र भारताच्या 190 धावा झाल्या असताना श्रेयस अय्यर 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर पंतही माघारी गेला. शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांनी भारताला 200 च्या पार पोहोचवले. मात्र शार्दुल ठाकूरला फक्त 4 धावांचे योगदान देता आले. यानंतर जडेजा आणि शमीने भारताला उपाहारापर्यंत 7 बाद 229 धावांपर्यंत पोहचवले. उपाहारानंतर जॉनी बेअरस्टोने शमीला 13 तर जडेजाला 23 धावांवर बाद केले. स्टोक्सनेच बुमराहला (7) बाद करत भारताचा डाव 245 धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडसमोर विजयासाठी 378 धावांचे आव्हान ठेवले.

हे आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंडच्या अ‍ॅलेक्स लिज आणि झॅक क्राऊलीने नाबाद शतकी सलामी दिली. लिजने दमदार अर्धशतक ठोकले. मात्र बुमराहने क्राऊलीचा (46) त्रिफळा उडवून देत जोडी फोडली. मात्र त्यानंतर त्यांची घरसगुंडी उडाली. बुमराहने झॅक क्राऊली आणि ऑली पोपला बाद केल्यानंतर मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाने मिळून अर्धशतक ठोकणार्‍या अ‍ॅलेक्स लिजला 56 धावांवर धावबाद केले. इंग्लंडचा हा गडगडलेला डाव अनुभवी जो रूट आणि पहिल्या डावात दमदार शतक करणार्‍या जॉनी बेअरस्टोने सावरला. बेअरस्टोला 14 धावांवर हनुमा विहारीने दिलेले जीवदान महागात पडले.

भारत : प. डाव : 84.5 षटकांत सर्वबाद 416 धावा. (IND vs ENG 5th Test)

इंग्लंड : प. डाव : 61.3 षटकांत सर्वबाद 284.

भारत : दु. डाव : शुभमन गिल झे. क्राऊली गो. अँडरसन 4, चेतेश्वर पुजारा झे. लीज गो. ब्रॉड 66, हनुमा विहारी झे. बेअरस्टो गो. ब्रॉड 11, विराट कोहली झे. ज्यो रूट गो. स्टोक्स 20, ऋषभ पंत झे. रूट गो. लीच 57, श्रेयस अय्यर झे. अँडरसन गो. पॉटस 19, रवींद्र जडेजा त्रि. गो. स्टोक्स 23, शार्दुल ठाकूर झे. क्राऊली गो. पॉटस 4, मो. शमी झे. लीज गो. स्टोक्स 13, जसप्रीत बुमराह झे. क्राऊली गो. स्टोक्स 7, मो. सिराज नाबाद 2. अवांतर 19. एकूण 81.5 षटकांत सर्वबाद 245 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1/4, 2/43, 3/75, 4/153, 5/190, 6/198, 7/207, 8/230, 9/236, 10/245.

गोलंदाजी : जेम्स अँडरसन 19-5-46-1, स्टुअर्ट ब्रॉड 16-1-58-2, मॅथ्थू पॉटस 17-3-50-2, जॅक लीच 12-1-28-1, बेन स्टोक्स 11.5-0-33-4, ज्यो रूट 6-1-17-0.

इंग्लंड : दुसरा डाव : 57 षटकांत 3 बाद 259 धावा.

Back to top button