कुस्तीगीर परिषदेवरील कारवाई अयोग्य : शरद पवार | पुढारी

कुस्तीगीर परिषदेवरील कारवाई अयोग्य : शरद पवार

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही राज्य संघटनांचे चुकत असेल तर राष्ट्रीय पातळीवरील संघटना प्रथम चर्चा करते. त्यामध्ये सुधारणा झाली नाही तर बडतर्फीची कारवाई करीत असते. राष्ट्रीय संघटनेकडून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर बडतर्फची केलेली कारवाई चुकीचीच असून त्यावर बैठक घेऊन दोघींवर कारवाई करू, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

पवार म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्याबाबत राष्ट्रीय कार्यकारिणीने कोणत्या प्रकरणाबाबत निर्णय घेतला हे तपासणे गरजेचे आहे. राष्ट्रीय संघटनेकडून दिलेल्या स्पर्धा वेळेत न घेतल्याचा ठपका ठेवला असला तरी परिषदेतील काहींच्या बाबतीत वैयक्तिक तक्रारीही राष्ट्रीय कार्यकारिणीकडे केलेल्या आहेत. या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन संबंधितांसमवेत परिषदेची बैठक घेण्यात येईल. या बैठकीतून दोषी असणार्‍यावर नक्कीच कारवाई करू.

परिषदेच्या कारभाराबाबत काहीजण माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते. याबाबत लक्ष घालून निर्णय घेऊ असे त्यांना सांगितले होते. परंतु तरीही राष्ट्रीय कार्यकारिणीकडे झालेल्या तक्रारी या गैरसमजातून असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्वांचा विचार करून दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीसमवेत बैठकीत यावर तोडगा काढून बडतर्फीची कारवाई मागे घेण्याबाबत नक्कीच विचार केला जाईल.

परिषदेवर केवळ नावालाच

शासन दरबारी असणार्‍या विविध सुविधा अथवा निधी संबंधित खेळाडूंपर्यंत मिळाल्या पाहिजेत या हेतूने मी परिषदेवर अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत होतो. खेळाडूंची निवड अथवा इतर बाबतीत मी लक्ष घालत नाही. परिषदेवर मी अध्यक्ष म्हणून केवळ नावालाच आहे. तेही पद वेळ आल्यावर सोडणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Back to top button