विम्बल्डन टेनिस : ओंस जबेऊर, हीथर वॉटसन चौथ्या फेरीत | पुढारी

विम्बल्डन टेनिस : ओंस जबेऊर, हीथर वॉटसन चौथ्या फेरीत

लंडन ; वृत्तसंस्था : विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला गटात तृतीय मानांकित ट्युनेशियाच्या ओंस जबेऊर हिने फ्रान्सच्या डियाने पेरी हिला 6-2, 6-3 असे हरवून एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. आता तिचा सामना माजी चॅम्पियन एंजेलिक कर्बर किंवा एलिसे मटंर्ेंसशी होणार आहे. जबेऊर गेल्या वेळी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली होती. ब्रिटनची हीथर वॉटसनसुद्धा पहिल्यांदाच चौथ्या फेरीत पोहोचली आहे. तिने स्लोवानियाच्या काजा जुवान हिला 7-6, 6-2 असे सहज पराभूत केले. ती बाराव्यांदा या स्पर्धेत सहभागी झाली असून तिचा सामना आता जर्मनीच्या जुले नीमेइयेर हिच्याविरुद्ध होणार आहे. येलेना ओस्टापेंको हीसुद्धा लॅटवियाच्या इरिना कामेलिया बेगू हिच्याविरुद्ध 3-6, 6-1, 6-1 असा विजय मिळवून चौथ्या फेरीत पोहोचली आहे.

पुरुष गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरी गाठलेला जॅक सोक हा तिसरी फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने मॅक्सिम क्रेसी याला 6-4, 6-4, 3-6, 7-6 असे हरवले. विम्बल्डन स्पर्धेचा इतिहास पाहता 1995 नंतर पहिल्यांदाच तिसर्‍या फेरी अखेर अमेरिकेचे आठ खेळाडू उरले आहेत. आता त्याची लढत ऑस्ट्रेलियाच्या जेसन कुबलेर याच्याशी होणार आहे. तोसुद्धा पात्रता फेरीतूनच पुढे आला आहे.

फ्रान्सिस टियाफो पहिल्यांदाच विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत पोहोचला आहे. त्याने कजाकिस्तानच्या अ‍ॅलेक्झांडर बुबलिक याला 3-6, 7-6, 7-6, 6-4 असे पराभूत केले. त्याचा पुढील सामना युगो हुम्बर्ट किंवा डेव्हीड गोफीन याच्यासोबत होईल.

सानिया मिश्र दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने आपला क्रोएशियाचा जोडीदार मॅट पाविच याच्या जोडीने विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. आपली शेवटची विम्बल्डन खेळणार्‍या सानिया आणि पाविच यांनी डेव्हिड वेगा हर्नांडिज आणि नटेला डी या जोडीला 6-4, 3-6, 7-6 सेटमध्ये पराभूत केले. महिला दुहेरी गटात सानिया चेक प्रजासत्ताकच्या लुसी राडेका हिच्यासोबत पहिल्या फेरीतच पराभूत झाली होती. 35 वर्षीय सानिया या सत्रानंतर टेनिस विश्वातून निवृत्ती घेणार आहे.

Back to top button