ऑस्ट्रेलियाचा लंकेवर दहा विकेटस्ने दणदणीत विजय | पुढारी

ऑस्ट्रेलियाचा लंकेवर दहा विकेटस्ने दणदणीत विजय

गॉल : वृत्तसंस्था :  ऑस्ट्रेलियाने गॉल कसोटीत श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करून 2021-23 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दिशेने आपली आघाडी मजबूत केली आहे. घरच्या मैदानावर श्रीलंकेचा हा सर्वात लाजिरवाणा कसोटी पराभव आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना तिसर्‍या दिवशी संपला आणि दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाने अवघ्या चार चेंडूंवर सामना खिशात घातला.

कॅमरून ग्रीनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने अवघ्या 212 धावा केल्या. पहिल्या डावात नॅथन लायनने पाच तर मिचेल स्वेपसनने तीन विकेट घेतल्या. श्रीलंकेसाठी निरोशन डिकवेलाने पहिल्या डावात 58 धावांचे योगदान दिले.

निरोशन डिकवेलाशिवाय अँजेलो मॅथ्यूजने 39 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 321 धावा केल्या. ग्रीनने 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, तर 71 धावा उस्मान ख्वाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच अ‍ॅलेक्स कॅरीनेही 45 धावा केल्या. श्रीलंकेकडून रमेश मेंडिसने चार विकेट घेतल्या.

तिसर्‍या दिवशी श्रीलंकेला धक्‍का

सामन्याच्या तिसर्‍या दिवशी अँजेलो मॅथ्यूज कोरोना पॉझिटिव्ह असल्याने मैदानावर आला नाही. त्याच्या जागी ओशिदा फर्नांडोला संघात स्थान मिळाले. सामन्याच्या तिसर्‍या दिवशी श्रीलंकेचा संघ एखाद्या क्लब संघाशी खेळत असल्यासारखा खेळत होता. दुसर्‍या डावात श्रीलंकेचा संपूर्ण डाव केवळ 113 धावांवर आटोपला.

Back to top button