जसप्रीत बुमराहला कर्णधार केल्याबद्दल वासिम जाफर नाराज | पुढारी

जसप्रीत बुमराहला कर्णधार केल्याबद्दल वासिम जाफर नाराज

मुंबई :  पुढारी वृत्‍तसेवा : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीला भारताचा कर्णधार रोहित शर्मा कोरोनाची लागण झाल्यामुळे मुकला. निवड समितीने त्याच्या जागी या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले. 1987 नंतर पहिल्यांदाच एका वेगवान गोलंदाजाला कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मात्र भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफर या निर्णयावर नाराज आहे. बुमराहला कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नसताना या महत्त्वाच्या सामन्यात जबाबदारी द्यायला नको होती, असे जाफरचे म्हणणे आहे. वसिम जाफरने एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की, या कसोटीसाठी चेतश्‍वर पुजाराला संघाचा कर्णधार करणे गरजेचे होते. चेतेश्‍वर पुजाराला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करण्याचा चांगला अनुभव आहे. तो चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतो.

सौराष्ट्रच्या या खेळाडूने भारताकडून जवळपास 95 कसोटी सामने खेळले आहेत. हे त्याला कर्णधार करण्यासाठी भरपूर आहे. जाफर म्हणाला की, त्याने चेतेश्‍वर पुजाराला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना पाहिले आहे. तो एक चांगला कर्णधार आहे. त्याने 90 आसपास कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी पुजाराला कर्णधार करणे हा योग्य निर्णय होता. जाफर म्हणाला की, गेल्या वेळी जसप्रीत बुमराह उपकर्णधार होता. त्यामुळे त्याला कर्णधार करणे स्वाभाविक गोष्ट होती.

मात्र सामना आणि मालिकेचे महत्त्व लक्षात घेता कोणताही अनुभव नसलेल्या खेळाडूला कर्णधारपद देणे म्हणजे अनिश्‍चितता. जसप्रीत बुमराह हुशार वाटतो. त्याला खेळ चांगल्या प्रकारे समजतोही. तो देखील हार्दिक पांड्यासारखे आपल्याला आश्‍चर्याचा धक्‍का देऊ शकतो.

Back to top button