जोस… इंग्लंडचा नवा बॉस | पुढारी

जोस... इंग्लंडचा नवा बॉस

लंडन : वृत्तसंस्था : काही दिवसापूर्वीच इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता इंग्लंडला मॉर्गनचा वारसदार मिळाला आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) जोस बटलरची इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. बटलर एक दशकाहून अधिक काळ इंग्लंडच्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचा सदस्य आहे. 2015 पासून तो उपकर्णधार होता.

31 वर्षीय जोसने यापूर्वी 14 वेळा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही प्रकारात इंग्लंडचे नेतृत्व केले आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी नेदरलँडस्विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्याचाही समावेश आहे. त्या सामन्यात मांडीच्या दुखापतीमुळे मॉर्गन खेळला नव्हता. जोस बटलर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतील 12 सामन्यांत इंग्लंडचे नेतृत्व करेल.

एकदिवसीय आणि टी-20 प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांच्या मार्गदर्शनाखाली बटलर ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषकावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. इंग्लंडमधील पुरुष क्रिकेटचे संचालक रॉब की यांनी कर्णधार पदासाठी बटलरच्या नावाची शिफारस केली होती.

इंग्लंडचा टी-20 संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, रिचर्ड ग्लीसन, ख्रिस जॉर्डन, लिएम लिव्हिंगस्टोन, डेवीड मलान, टायमल मिल्स, मॅथ्यू पर्किसन, जेसन रॉय, फिल सॉल्ट, रिस टॉप्ली, डेव्हिड विली.

इंग्लंडचा वन डे संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, ब्रेडन कार्से, सॅम कुरन, लिएम लिव्हिंगस्टोन, क्रेग ओव्हर्टन, मॅथ्यू पर्किसन, जो रूट, जेसन रॉय, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, डेव्हिड विली.

राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद मिळणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. यापूर्वी जेव्हाही मला असे करण्याची संधी मिळाली तेव्हाही मला फार आनंद झाला होता. मी संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल.
– जोस बटलर

Back to top button