मलेशिया ओपन चॅम्पियनशिप : सिंधू, प्रणॉय पराभूत | पुढारी

मलेशिया ओपन चॅम्पियनशिप : सिंधू, प्रणॉय पराभूत

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आशियातील मोठी स्पर्धा असलेली मलेशिया ओपन चॅम्पियनशिप जिंकण्याचे भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय हे पराभूत झाल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधू ताई यिंगकडून तर प्रणॉय जोनाथन ख्रिस्टीकडून पराभूत झाले.

मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का बसला. तैवानच्या ताई यिंगने तीन गेममध्ये सिंधूचा पराभव केला. सातव्या मानांकित सिंधूचा दुसर्‍या मानांकित ताईने 13-21, 21-15, 21-13 तीन सेटमध्ये पराभव केला. ताईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

गेल्या काही काळापासून तैवाच्या ताईने सिंधूवर कायम वर्चस्व राखले आहे. या दोघींमध्ये आतापर्यंत 21 सामने झाले आहेत. त्यातील 16 सामने ताई यिंग आणि सिंधूने 5 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात पहिल्या गेममध्ये सिंधूने ताईवर 13-21 असे वर्चस्व राखले. या गेममध्ये सिंधू 2-5 ने पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर तिने 11-7 अशी आघाडी घेतली. मात्र दुसर्‍या गेममध्ये ताईने 21-15 आणि तिसरा गेम 21-13 असा जिंकत सामना खिशात टाकला. ताईने जरी दोन्ही गेम जिंकले असले तरी या गेममध्ये सिंधूने देखील कडवी टक्कर दिली होती.

प्रणॉयकडूनही निराशा

सिंधू पराभूत झाल्यानंतर भारताच्या आशा थॉमस कप गाजवणार्‍या एच. एस. प्रणॉयवर टिकून होत्या. त्याचा उपांत्यपूर्व फेरीत सामना जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणार्‍या जोनाथन ख्रिस्टी याच्यासोबत झाला. पण प्रणॉयनेही निराशा केली. तो 18-21, 16-21 असा पराभूत झाला. या सामन्यात प्रणॉय फारसा लयीत दिसला नाही. जोनाथनच्या वेगवान खेळापुढे तो पुरता निष्प्रभ ठरला.

Back to top button