टी-20 वर्ल्डकप : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, अनकॅप्ड’ जोस इंग्लिसला थेट संधी | पुढारी

टी-20 वर्ल्डकप : ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, अनकॅप्ड’ जोस इंग्लिसला थेट संधी

मेलबर्न : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी टी-20 वर्ल्डकप साठी आपल्या संघाची गुरुवारी घोषणा केली. या संघात माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन झाले असले तरी एका नवीन नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या (अनकॅप्ड) जोस इंग्लिस याला थेट वर्ल्डकप संघात स्थान मिळाले आहे. दिग्गज खेळाडू अ‍ॅलेक्स कॅरी याला डावलून जोसला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबरमध्ये होणार्‍या आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी मजबूत संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. यष्टिरक्षक मॅथ्यू वेडला बॅकअप म्हणून जोस इंग्लिसचा समावेश करण्यात आला आहे.

एकदिवसीय विश्‍वचषकमध्ये पाच वेळचा चॅम्पियन आणि दोन वेळचा उपविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला अजूनही टी-20 विश्‍वचषक जिंकता आलेला नाही.स्मिथला दुखापत असून, देखील संघात स्थान देण्यात आले आहे तर, गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेला कर्णधार एरॉन फिंच हा स्पर्धेपर्यंत फिट होईल.

‘गेम चेंजर’ जोस : टी-20 क्रिकेटमध्ये विस्फोटक यष्टिरक्षक फलंदाज अशी ख्याती मिळवणार्‍या जोसने टी-20 लीग क्रिकेटमध्ये दोन शतके ठोकली आहेत. बीग बॅशमध्ये जोश पर्थ स्कॉचर्सकडून खेळतो आहे. या स्पर्धेत 41 सामन्यांतील 37 डावांत 29.41 च्या सरासरीने 941 धावा केल्या आहेत.

यात त्याची 8 अर्धशतके आहेत. एकूण टी-20 आकडेवारी पाहिली तर त्याच्या नावापुढे 151.61 चा जबरदस्त स्ट्राईक रेटची नोंद आहे. डाव्या हाताने खेळणारा जोस हा मोठे फटके मारण्यात पटाईत असून, अनेक सामन्यात त्याने ‘गेम चेंजर’ची भूमिका बजावली आहे.

ऑस्ट्रेलियन संघ : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स, अ‍ॅश्ग्टन एगर, जोश हेजलवूड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

Back to top button