आम्ही तुम्हाला बंदूक भेट देऊ शकत नाही, राही सरनोबतची मोदींपुढे खंत - पुढारी

आम्ही तुम्हाला बंदूक भेट देऊ शकत नाही, राही सरनोबतची मोदींपुढे खंत

नवी दिल्ली; वृत्तसंस्था: जपानची राजधानी टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या सर्व खेळाडूंनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत मोदींनी पदक विजेत्या आणि पदक मिळवू न शकलेल्या अशा सर्व खेळाडूंची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिने आपण नरेंद्र मोदींना बंदूक भेट देऊ शकत नसल्याची खंत व्यक्त केली.

मोदींनी सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रा, रौप्यपदक विजेते रविकुमार दहिया, बॉक्सर लव्हलिन, कांस्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू, पुरुष हॉकी संघ आणि बजरंग पुनिया आदी पदक विजेत्यांची भेट घेतली. अन्य खेळाडूंना देखील मोदींनी वेळ दिला आणि त्यांचे अनुभव विचारले.

भारतीय नेमबाजांना भेटताना मोदींशी कोल्हापूरच्या राही सरनोबतने संवाद साधला.

राहीने प्रथम स्वत:ची ओळख करून दिली. ती म्हणाली, ‘मी २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात देशाचे प्रतिनिधत्व करते.

मी नेमबाज संघाकडून सांगू इच्छीते की, अन्य सर्व खेळाडूंनी तुम्हाला काही ना काही गिफ्ट दिले आहे; पण आम्हाला माफ करा. कारण, आम्ही तुम्हाला बंदूक भेट देऊ शकत नाही. मात्र, आमची इच्छा आहे की, तुम्ही कधी तरी शूटिंग रेंजवर यावे आणि आमच्या बंदुकीसोबत सराव करावा.’

बरे झाले तुम्ही बंदूक आणली नाही

राहीच्या या मजेशीर वक्तव्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले, ‘बरे झाले तुम्ही बंदूक आणली नाही. नाही तर एसपीजीवाल्यांनी तुम्हाला बाहेरच रोखले असते. एसपीजीचे सुरक्षा जवान ते पाहताच घाबरले असते.’ या संवादानंतर एकच हशा पिकला.

राही आणि मोदी यांच्यात झालेल्या या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोदींना भेटण्यासाठी आलेल्या काही खेळाडूंनी त्यांना भेट देण्यासाठी वस्तू आणल्या होत्या. पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटन रॅकेट, तर नीरज चोप्राने भाला आणला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button