इंग्लंडच्या 21 वर्षीय नवख्या गोलंदाजापुढे भारतीय फलंदाजी ढेपाळली | पुढारी

इंग्लंडच्या 21 वर्षीय नवख्या गोलंदाजापुढे भारतीय फलंदाजी ढेपाळली

लिसेस्टर ; वृत्तसंस्था : इंग्लंडला पाचव्या कसोटीत हरवून विक्रमी कामगिरी करण्याच्या इराद्याने इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज सराव सामन्यात ढेपाळले. लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा निम्मा संघ 81 धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी हे फलंदाज 21 वर्षीय गोलंदाज रोमन वॉकरच्या गोलंदाजीवर माघारी परतले. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही.

लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतल्याने शुभमन गिलचे इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत सलामीला खेळणे पक्के झाले आहे. आजही तो रोहितसह सलामीला आला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सुरेख सामना करताना गिलने काही चांगले फटकेही मारले; पण 10 व्या षटकात गिल व शर्मा यांची 35 धावांची भागीदारी संपुष्टात आली. विल डेव्हिसच्या गोलंदाजीवर रिषभने यष्टींमागे सुरेख झेल टिपला अन् गिल 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर 16 व्या आणि 18 व्या षटकात भारताचे दोन फलंदाज रोमन वॉकरने माघारी पाठवले.

पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा 25 धावांवर बाद झाला, तर हनुमा विहारीनेही 3 धावांवर विकेट टाकली. भारताची अवस्था 3 बाद 54 अशी झाली. प्रसिद्ध कृष्णाने भारताला चौथा धक्का देताना श्रेयस अय्यरला भोपळ्यावर माघारी पाठवले. भारताचे 4 फलंदाज 55 धावांवर तंबूत परतले. त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजा व विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या व सहाव्या विकेटसाठी 26 धावांची भागीदारी केली. वॉकरने ही जोडी तोडताना जडेजाला 13 धावांवर पायचित केले. भारताचा निम्मा संघ 81 धावांवर माघारी परतला.

Back to top button