विराट कोहली, रोहित शर्मा, के एल राहुलवर कपिल देव भडकले, म्हणाले... | पुढारी

विराट कोहली, रोहित शर्मा, के एल राहुलवर कपिल देव भडकले, म्हणाले...

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : क्रिकेटमध्ये फक्त नाव मोठे असून चालत नाही, तर नावाप्रमाणेच कामगिरी सतत मोठी होत गेली पाहिजे. तसे होत नसेल, तर त्यांनी आपली जागा रिकामी केली पाहिजे, अशा शब्दांत माजी कर्णधार कपिल देव यांनी भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या तीन खेळाडूंना सुनावले आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्मशी झुंजत आहे. या यादीत रोहित शर्मा आणि के. एल. राहुलदेखील आहेत. या इनफॉर्म कामगिरीवर भारताच्या माजी क्रिकेटर्सपासून अनेक दिग्गज खेळाडू टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, कपिल देव यांनी दिग्गज तिन्ही खेळाडूंबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे.

जर हे तीन खेळाडू टी-20 फॉरमॅटमध्ये त्यांच्या स्ट्राईक रेटवर काम करत नसतील, तर त्यांच्या जागी नवीन खेळाडू घेण्याचा विचार केला पाहिजे, असा इशारा कपिल देव यांनी दिला. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलदरम्यान विराट आणि रोहित अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करू शकले नाहीत, तर के. एल. राहुलवर त्याच्या संथ फलंदाजीची टीका झाली.

एका यूट्यूब चॅनेलवर संवाद साधताना कपिल देव यांनी या तिघांवर भाष्य केले आहे. या तिघांच्या स्ट्राईक रेटबद्दल विचारले असता ते म्हणाले, या सर्वांचे नाव मोठे आहे आणि त्याचा दबाव या तिघांवरही आहे, जे होऊ नये. तुम्ही निर्भयपणे क्रिकेट खेळले पाहिजे. हे तिघेही असे खेळाडू आहेत जे 150-160 च्या स्ट्राईक रेटने धावा करू शकतात. जेव्हा आम्हाला मोठ्या धावसंख्येची गरज असते, तेव्हा तिघेही मोक्याच्या क्षणी बाद होतात. संघासाठी हे हितकारक नाही.

Back to top button