इंग्लंडमध्ये टी-20 मालिकेत विक्रमाची भारताला संधी | पुढारी

इंग्लंडमध्ये टी-20 मालिकेत विक्रमाची भारताला संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

द. आफ्रिकेविरुद्ध नुकतीच संपलेली पाच टी-20 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविल्यानंतर भारतीय संघ आता युरोप दौर्‍यावर आहे. आयर्लंडविरुद्ध दोन सामने खेळल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध एक कसोटी सामना आणि त्यानंतर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेमध्ये इंग्लंडला त्यांच्याच भूमीत हरवून भारताला नवा विश्वविक्रम नोंदविण्याची संधी आहे. या मालिकेदरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात धावांची अनोखी शर्यतही रंगण्याची शक्यता आहे.

कोणत्या विक्रमाची आहे संधी

भारतीय संघाने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये एकूण 6 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने दोन तर इंग्लंडने चार विजय मिळविले आहेत. इंग्लंडमधील विजयाच्या बाबतीत भारताने सध्या ऑस्ट्रेलियाशी बरोबरी साधली आहे. तर श्रीलंका, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पाक हे भारताच्या पुढे आहेत.

पाकच्या नावे सर्वाधिक विजय

क्रिकेटच्या टी-20 या प्रारूपात इंग्लंडला इंग्लंडमध्येच सर्वाधिक वेळा पराभूत करण्याचा विक्रम पाकच्या नावे नोंद आहे. पाकने इंग्लंडमध्ये 12 सामन्यांत चारवेळा विजय मिळविला आहे. तर, इंग्लंडने सात विजय मिळविले आहेत. तर, एक सामन्याचा निकाल लागलेला नाही.

भारताला गरज विजयाच्या हॅट्ट्रिकची

इंग्लंडमध्ये टी-20 प्रारूपात इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक विजय मिळविण्याचा पाकचा विक्रम मागे टाकावयाचा असेल तर भारताला आगामी मालिकेत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवावी लागेल. मात्र, इंग्लंडचा संघ मायदेशात सातत्याने चांगली कामगिरी करतो. वेस्ट इंडिजचा अपवाद वगळता आजपर्यंत कोणत्याही संघाला इंग्लंडमध्ये जास्त विजय आणि कमी पराभव मिळविता आलेले नाहीत. वेस्ट इंडिजनेही इंग्लंडमध्ये सात सामने खेळताना चार विजय प्राप्त केले आहेत.

2018 मध्ये जिंकली होती मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये यापूर्वी 2018 मध्ये टी-20 मालिका झाली होती. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने बाजी मारताना 2-1 अशी जिंकली होती. तत्पूर्वी 2011 आणि 2014 मध्ये इंग्लंड दौर्‍यातील मालिका 1-1 ने बरोबरीत सुटल्या होत्या. याशिवाय मायदेशी 2009 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले होते.

कोहली व रोहित यांच्यात चुरस

इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली आघाडीवर आहे. त्याने पाच सामन्यांत एका अर्धशतकासह 180 धावा काढल्या आहेत. तर, दुसर्‍या स्थानावर रोहितने पाच सामन्यांत 147 धावा काढल्या आहेत. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हे दोघे खेळणार की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण, 5 जुलै रोजी एकमेव टेस्ट संपणार आहे. मात्र, व्यस्त कार्यक्रमामुळे बीसीसीआयकडून या दोन खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते.

Back to top button