विराट कोहलीही झाला होता कोरोनाबाधित | पुढारी

विराट कोहलीही झाला होता कोरोनाबाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

यजमान इंग्लंडविरुद्ध येत्या एक जुलैपासून सुरू होणार्‍या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे.कारण, भारतीय संघाचे काही खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अवघ्या एक दिवसापूर्वीच ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तो इंग्लंडला रवाना होऊ शकला नाही. आता अशी माहिती मिळत आहे की, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली लंडनमध्ये पोहोचल्यानंतर कोरोना संक्रमित आढळल्याचे स्पष्ट होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालदीवमध्ये सुट्टी घालवून परतल्यानंतर कोहलीही कोरोनाच्या विळख्यात सापडला होता.सध्या कोहली यातून सावरला आहे. मात्र, याचा परिणाम लिसेस्टरविरुद्ध होणार्‍या सराव सामन्यावर पडू शकतो. किमान कोहलीबाबत तरी होऊ शकतो. दरम्यान, संघ व्यवस्थापनानेही कोरोनातून बाहेर पडलेल्या खेळाडूंवर जास्त दबाव न टाकण्याची सूचना केली आहे. तसेच मालदिवहून परतल्यानंतर कोहलीला हॉस्पिटलला जाताना पाहण्यात आले होते.

मास्कविना कोहली फिरला रोहित शर्मासोबत

कोहली सध्या भलेही कोरोनातून सावरलेला असला तरी त्याची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यामध्ये तो मास्क नसताना लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. यावेळी काही चाहत्यांनी विराटसोबत सेल्फीही घेतल्या होत्या. उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी विराटसोबत कर्णधार रोहित शर्माही शॉपिंग करताना दिसून आला होता. अशा स्थितीत कोहलीचे हे कृत्य अन्य खेळाडूंना समस्यांचे कारण बनू शकते.

संक्रमित असूनही कोहली संघासोबत कसा गेला?

आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, मालदिवहून परतल्यानंतर जर कोहली कोरोनाबाधित आढळला असेल तर तो अन्य खेळाडूंसोबत कसा काय इंग्लंडला गेला. याउलट आर. अश्विनने आपल्याला कोरोना झाल्याचे समजताच अन्य खेळाडूंसोबत इंग्लंडला जाण्यास नकार दिला होता. अश्विन सध्या कोरोनातून सावरत आहे. दरम्यान, बीसीसीआयनेही विराटला कोरोना झाल्याबाबतची कसलीच माहिती दिलेली नाही.

Back to top button