लैंगिक शोषण करणार्‍या कोचला ‘पीसीबी’ ने केले निलंबित | पुढारी

लैंगिक शोषण करणार्‍या कोचला ‘पीसीबी’ ने केले निलंबित

इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्यांच्या राष्ट्रीयस्तरावरील प्रशिक्षकाला निलंबित केले. त्याच्यावर महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुल्तान भागातील नदीम इक्बाल असे या कोचचे नाव असून, तो एक प्रसिद्ध माजी वेगवान गोलंदाज होता. ज्या संघाकडून वकार युनिस खेळायचा त्याच संघाकडून नदीमनेदेखील प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान, ‘पीसीबी’ अधिकार्‍यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, नदीमने बोर्डाच्या कराराचा भंग केल्याचे आढळून आले आहे.

‘पीसीबी’ अधिकारी म्हणाले की, आम्ही कोणतीही फौजदारी चौकशी करू शकत नाही, ते पोलिसांचे काम आहे. मात्र, आम्ही केलेल्या चौकशीत नदीमने बोर्डाच्या कराराचा भंग केल्याचे आढळून आले आहे. 50 वर्षांच्या नदीमने 80 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. पीडितेने नदीमविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी पीडिता ‘पीसीबी’ महिला ट्रायल्ससाठी मुल्तानला गेली होती, त्यावेळी नदीम तेथील एक प्रशिक्षक होता.

पीडितेने सांगितल्याप्रमाणे नदीमने महिला संघात निवड करण्याचे आश्वासन देऊन माझ्याशी जवळीक वाढवली. याचबरोबर त्याने बोर्डात मला नोकरी देण्याचेही आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात त्याने माझा लैंगिक छळ केला. याचबरोबर त्यांच्या मित्रांनीदेखील माझा छळ केला. त्याच्याकडे माझा व्हिडीओदेखील आहे, तो दाखवून मला ब्लॅकमेलदेखील करत होता.

2014 मध्ये पाच युवा महिला क्रिकेटपटूंनी मुल्तान क्रिकेट क्लबच्या अधिकार्‍यांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. पीडित क्रिकेटपटूने माध्यमांना सांगितले की, प्रसिद्ध क्रिकेट क्लबमधील हे अधिकारी जिल्हा क्रिकेट असोसिएशनशी संलग्नित आहेत. त्यांनी निवड करण्याच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली होती.

Back to top button