Indian Fast Bowling : सौरभ गांगुलीचा पाया, विराटचा कळस | पुढारी

Indian Fast Bowling : सौरभ गांगुलीचा पाया, विराटचा कळस

पुढारी ऑनलाईन : अनिरुद्ध संकपाळ

भारताने इंग्लिश फलंदांजांना दोन सत्रातच आसमान दाखवत लॉर्ड्स सर केलं. या विजयानंतर भारतीय वेगवान गोलंदाजीची ( Indian Fast Bowling ) जोरदार चर्चा सुरु झाली. विराट कोहलीने टीम इंडियाच्या गोलंदाजांना एक कठीण टास्क दिला होता. त्यांना फक्त दोन सत्रात इंग्लंडचा दुसरा डाव त्यांच्यात मायभूमीत संपवायचा होता.

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी हे टास्क पूर्ण करुन इंग्लिश फलंदाजांच्या लॉर्ड्सवरच नांग्या ठेचल्या. लॉर्ड्सवर दोन्ही डावात भारतीय वेगवान गोलंदाजांनी ( Indian Fast Bowling ) इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद केले. भारताची पारंपरिक ताकद फिरकी गोलंदाजी म्हणून ओळखली जाते. मात्र आता त्याच्या खांद्याला खांदा लावून वेगवान गोलंदाजी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलत आहे.

सौरभ गांगुलीच्या काळात दुष्काळ संपला

पण, ही गोष्ट एका रात्रीत झालेली नाही. भारताच्या वेगावाग गोलंदाजीच्या ज्या काही दोन – चार तगड्या फळ्या दिसत आहेत त्याचा पाया सौरभ गांगुलीने रचला आहे. त्याच्यात कॅप्टन्सीखाली भारतीय वेगवान गोलंदाजांनी मैदान मारण्यास सुरुवात केली होती.

जहीर खान, आशिष नेहरा, रुद्रप्रताप सिंह, इरफान पठाण यासारखे वेगवान गोलंदाज त्याच्याच नेतृत्वाखाली तयार झाले. विदेशात भारतीय संघाचा डंका वाजवण्याची इच्छाशक्ती असलेल्या सौरभ गांगुलीने आपल्या संघाची निवड करतानाही त्याच पद्धतीने केली.

त्याच्याच कार्यकाळात भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये विदेशी फलंदाजांची भंबेरी उडवून देण्याच्या जिद्दीचे बाळसे धरले. ती जिद्द आता मोठी झाली आहे आणि विदेशात आपल्या वेगवान तोफा धडाडू लागल्या आहेत.

एमआरएफ फाऊंडेशनचा पडद्यामागील रोल

भारतात उत्तम दर्जाचे वेगवान गोलंदाज तयार करण्याचे काम १९८७ सालीच सुरु झाले होते. ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईत एमआरएफ पेस फाऊंडेशन सुरु करण्यात आली. त्या पेस फाऊंडेशनमध्ये भारताच्या अनेक भागातून होतकरु वेगवान गोलंदाज येऊ लागले.

एखादा वेगवान गोलंदाज जिल्हा, राज्य पातळीवर चमकतो, त्याला एमआरएफ फाऊंडेशनमध्ये पुढचे ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले जाते. त्यातूनच भारताची वेगवाग गोलंदाजांची ( Indian Fast Bowling ) रसद तयार होऊ लागली. या पेस फाऊंडेशनमध्ये तयार झालेल्या अनेक खेळाडूंनी पुढे देशाचे प्रतिनिधित्व केले.

आजही विविध राज्यातील तरुण वेगवान गोलंदाज एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये निवड होण्यासाठी उत्सुक असतात. सध्या आयपीएलमध्ये चमक दाखवलेला आणि भारतीय संघाचा दरवाजा ठोठावणारा प्रसिद्ध कृष्णा देखील एमआरएफ पेस फाऊंडेशनचेच प्रोडक्शन आहे.

स्पेशल जीम ट्रेनिंग

भारतात वेगवान गोलंदाजीला आकार देण्यात स्पेशल जीम ट्रेनरचाही विशेष योगदान आहे. या स्पेशल जीम ट्रेनिंगमध्ये प्रत्येक वेगवान गोलंदाजा, त्याच्या अॅक्शनचा आणि त्याला कोणत्या अवयवाची जास्त गरज आहे याचा शास्त्रीय अभ्यास केला जातो. त्यानुसार त्या त्या वेगवान गोलंदाजाचे जीम ट्रनिंग ठरते.

यापूर्वी सर्वसाधारण जीममधील प्रकार सर्वांसाठी सरसकट असायचे. मात्र आता स्पेशल जीम ट्रेनिंगमध्ये प्रत्येक गोलंदाजाला त्याच्या गरजेनुसार व्यायाम प्रकार दिले जातात. याचा फायदा गोलंदाजाच्या गरजेच्या अवयवांचीच ताकद वाढवण्यासाठी झाला.

यामुळे भारतीय वेगवाग गोलंदाजांच्या क्षमतेत आणि फिटनेसमध्ये वाढ झाली. त्यांची कारकिर्दही वाढली आणि कामगिरीतही चांगली सुधारणा झाली.

रोटेशनने ताण केला कमी

भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत जी रोटेशन पॉलिसी अवलंबली आहे. त्याचा फायदा भारताला बेंच स्ट्रेंथ स्ट्राँग करण्यात झाला. याचबरोबर वेगवान गोलंदाजाला वेळोवेळी रेस्टही मिळत आहे. जितक्या प्रमाणात जहीर खान, आशिष नेहरा हे गोलंदाज सातत्याने जायबंदी होत होते. मात्र आताचे गोलंदाज तुलनेने अधिक फिट आहेत. कारण त्यांच्यावरील ताणाचे योग्य मॅनेजमेंट झाले आहे.

रोटेशन पॉलिसीमुळे अनेक वेगवान गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय स्तरावार खेळण्याची संधी मिळाली. तसेच संघातील स्थानाबाबत शाश्वतीही मिळाली. या रोटेशन पॉलिसीची फळे आपल्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रकर्षाने दिसली. यावेळी भारतीय संघातील महत्वाचे गोलंदाज संघात नसतानाही बेंच स्ट्रेंथने कसलेल्या गोलंदाजांची कमी भासू दिली नाही.

विराट माईंडसेटचा बुस्टर डोस

भारतीय वेगवान गोलंदाज ( Indian Fast Bowling ) आंतरराष्ट्रीय स्तरावार ठळकपणे उठून दिसण्यात विराटचाही वाटा आहे. त्याच्या नेतृत्वात संघातील वेगवान गोलंदाजांमधली आक्रमकतेची धार वाढली. विराटने विदेशात खेळताना या गोलंदाजांवर डोळे झाकून विश्वास दाखवलाच. पण, फिरकीला पोषक असणाऱ्या मायदेशातही त्याने वेगवान गोलंदाजांच्या हातात आशेने चेंडू सोपवला. या गोलंदाजांनी विराटला निराश केले नाही.

विशेष म्हणजे भारताकडून भरपूर विकेट काढणारा आर. अश्विन देखील इंग्लंडमध्ये बेचवर बसतो. हे फक्त विराट माईंडसेटमुळेच शक्य झाले आहे. त्याने चार वेगवान गोलंदाज खेळवण्याची रणनीती अवलंबली. त्यासाठी कसोटीतला सर्वात चांगला फिरकीपटूही त्याने बाहेर बसवला.

विराटला वेगाचे आकर्षण आहेच. इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या दिवशी सामना जिंकण्याचा प्रखर इरादा त्याच्या बॉडी लँगवेजमधून दिसून येत होताच. तो आपल्या गोलंदाजाना सातत्याने विकेट घेण्याच्या उद्देशानेच गोलंदाजी करण्याचे सांगत होता. या विराट माईंडसेटमुळेही भारताची वेगवान गोलंदाजी अधिक धारधार झाली आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : संशोधनाची सुरुवात शाळेतूनच व्हायला हवी 

Back to top button