आयपीएल संघ खेळतील विदेशात सामने | पुढारी

आयपीएल संघ खेळतील विदेशात सामने

मुंबई : वृत्तसंस्था : आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (आयसीसी) अडीच महिन्यांचा कालावधी (विंडो) मागितला असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी दिली. आयपीएल संघांनी विदेशात जाऊन मैत्रीपूर्ण सामने खेळावेत, अशी योजना असून त्यावर बीसीसीआय आणि फ्रँचाईजी विचार करत असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये आयपीएल संघांची संख्या 8 वरून 10 वर गेली आहे.

या सीझनमध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ जायंटस् या संघांनी पदार्पण केले होते. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढली आणि स्पर्धा दोन महिने रंगली. या काळात आपापल्या देशांच्या मालिकांमध्ये संबंधित खेळाडू परत गेल्याने फ्रँचाईजींना त्रास सहन करावा लागला, तर काही खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघातून खेळण्यासाठी आयपीएलपासून दूर राहिले. त्यामुळे आयसीसीने बीसीसीआयकडे अडीच महिन्यांचा कालावधी मागितला आहे. जेणेकरून आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांतील विदेशी खेळांडूना संबंधित संघातून खेळता येईल.

‘आयपीएल’ जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीग

आयपीएल ही जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या लीगमध्ये सामील झाली आहे. कोरोना काळात क्रिकेटचा फीव्हर पुन्हा निर्माण करण्यात आयपीएलने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 2017 मध्ये डिजिटलच्या माध्यमातून आयपीएलचा आनंद लुटणार्‍यांची संख्या 560 दशलक्ष होती. आता 2022 मध्ये त्यात वाढ होऊन ही संख्या 665 दशलक्ष झाली असल्याचे जय शहा यांनी सांगितले.

Back to top button