हार्दिकच्या शतकाने मुंबई सुस्थितीत | पुढारी

हार्दिकच्या शतकाने मुंबई सुस्थितीत

बंगळूर : वृत्तसंस्था : हार्दिक तमोेरे (115) याने शानदार झळकावलेल्या शतकाच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात सुस्थिती प्राप्त केली. हार्दिकचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरे शतक होय.

पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वाल (100) व दुसर्‍या दिवशी हार्दिक तमोरे याने शतक झळकावल्याने मुंबईने पहिल्या डावात 140.4 षटकांत सर्वबाद 393 अशी सुस्थिती प्राप्त केली. हार्दिक सध्या दोन वर्षांनंतर प्रथमच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असून, त्याने अवघ्या सहाव्या डावात दुसरे शतक ठोकले. दरम्यान, उत्तर प्रदेशने दुसर्‍या डावात अडखळत सुरुवात करताना दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 बाद 25 धावा काढल्या आहेत.

मुंबईने मंगळवारच्या पहिल्या डावातील 5 बाद 260 धावांवरून बुधवारी पुढे खेळण्यास सुरुवात केली. हार्दिक तमोरे व शम्स मुलानी या मंगळवारच्या नाबाद जोडीने सहाव्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागीदारी साकारली. शम्स मुलानी (50) अर्धशतक झळकावून बाद झाला. मात्र, तनुष कोशियन (22) याने हार्दिकला चांगली साथ दिली.

विकेटकिपर फलंदाज तमोरेने 172 चेंडूंत 11 चौकार व एक षटकारासह 115 धावा काढल्या. तो शेवटच्या विकेटच्या रूपात बाद झाला. उत्तर प्रदेशच्या वतीने करण शर्माने 4, तर सौरभ कुमारने 3 विकेट घेतल्या. उत्तर प्रदेशची सुरुवात निराशाजनक झाली. माधव कौशिकसोबत डावाची सुरुवात करणार्‍या समर्थ सिंगला धवल कुलकर्णीने शून्यावरच बाद केले, तर तुषार देशपांडेने प्रियम गर्गला 3 धावांवर त्रिफळाबाद केले. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा माधव कौशिक 11, तर कर्णधार करण शर्मा 10 धावांवर खेळत आहेत.

अहमद, तिवारीने बंगालला सावरले

दरम्यान, दुसर्‍या सेमीफायनल सामन्यात मध्यप्रदेशने बंगालची पहिल्या डावात 5 बाद 197 अशी स्थिती करून सामन्यावर पकड मिळविली आहे. बंगालने पहिल्य डावात 341 धावा केल्या आहेत. बंगालची एकवेळ 5 बाद 54 अशी अवस्था असताना शाहबाज अहमद (नाबाद 72) व मनोज तिवारी (नाबाद 84) यांनी 143 धावांची भागीदारी करून संघाला सावरले.

Back to top button