पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय फुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. फिलीपिन्सविरुद्ध पॅलेस्टाईनने ४-० असा विजय मिळवल्यानंतर भारताने ही कामगिरी केली. आता मंगळवारी (१४ जून) होणाऱ्या पुढील सामन्यात भारत हाँगकाँगकडून पराभूत झाला तरी त्याचा पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही. (Indian Football Team qualifies AFC Asian Cup)
भारतीय संघाने एकूण पाचव्यांदा या स्पर्धेत प्रवेश केला आहे. तसेच, भारतीय संघ सलग दोन वेळा या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. १९६४ मध्ये भारताने पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर १९८४, २०११ आणि २०१९ च्या स्पर्धाही खेळल्या. (Indian Football Team qualifies AFC Asian Cup)
एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने कंबोडिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताने कंबोडियाविरुद्ध २-० असा विजय मिळवला, तर अफगाणिस्तानवर २-१ ने मात केली. सुनील छेत्रीने कंबोडियाविरुद्ध दोन्ही गोल केले. तर छेत्री आणि सहल अब्दुल समद यांना अफगाणिस्तानविरुद्ध गोल करण्यात यश मिळाले. (Indian Football Team qualifies AFC Asian Cup)
अफगाणिस्तानविरुद्ध गोल केल्यानंतर आता भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने १२८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८३ गोल केले आहेत. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोने १८९ सामन्यांमध्ये ११७ गोल केले आहेत आणि मेस्सीने ८६ (१६२ सामने) केले आहेत. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सुनील छेत्रीने गोल केल्यास तो मेस्सीच्या जवळ जाईल.