Rohit Sharma : रोहित शर्मा शिवाय विजयाचे मैदान रिकामेच; कोहली, राहुलनंतर पंतही फ्लॉपच | पुढारी

Rohit Sharma : रोहित शर्मा शिवाय विजयाचे मैदान रिकामेच; कोहली, राहुलनंतर पंतही फ्लॉपच

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेविरूध्द आतापर्यंत झालेल्या दाेन सामन्यात पराभव पत्करावी लागली आहे. अचूक गोलंदाजी आणि भक्‍कम फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या टी-२० सामन्यात भारताचा ४ विकेट्सनी पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेतील भारताचा हा दुसरा पराभव असून, पाहुण्या संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे.

दुसर्‍या टी-२० सामन्यात ऋषभ पंतला आफ्रिकेविरूध्द बरोबरी करण्याची संधी होती. परंतु त्याला हा सामना जिंकता आला नाही. राहूल जखमी असल्याने आणि रोहितच्या (Rohit Sharma) गैरहजरीत ऋषभ पंतला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून छाप पाडण्याची संधी होती. पण तसे न होता, पुन्हा भारताच्या पराभवात भरच पडली.

यंदा भारतीय संघाला रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताने २०२२ मध्ये एकून १८ सामने खेळले आहेत. यामध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली ११ सामन्यामध्ये भारताला विजय मिळला आहे. तसेच उरलेल्या ७ सामन्यात विराट कोहली, केएल राहूल आणि ऋषभ पंत या तिघांनी नेतृत्व केले आहे. मात्र हे तिघेही विजय मिळवून देण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहेत.

रोहित शर्मा याने भारताला तीन वनडे, सहा टी २० आणि दोन टेस्ट सामन्यात यश मिळवून दिले आहे. भारताने वेस्ट इंडिजला रोहित शर्माच्या नेतृत्वात तीन टी-२० सामने आणि ३ वनडे सामन्यात क्लीन स्वीप दिला. तर श्रीलंकेला देखील तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत केले.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला दक्षिण आफ्रिकेविरोधात एक कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे केएल राहुलच्या नेतृत्वात भारताला दक्षिण आफ्रिकेविरोधात एक कसोटी सामना आणि तीन एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता कोहली आणि राहुलनंतर ऋषभ पंतला देखील दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधार ऋषभ पंत खराब शॉट खेळून आऊट झाला. जेव्हा संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, त्याचवेळी त्याने आपली विकेट गमावली. ७ चेंडूंत ५ धावा करून पंत बाद झाला. या सामन्यात दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी शेवटच्या तीन षटकांत ३६ धावांची भागीदारी केल्यामुळे भारताला ६ बाद १४८ धावांची मजल मारता आली.

Back to top button