पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू म्हणताे, ‘सचिनमुळे मी स्टार बनलो’ | पुढारी

पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू म्हणताे, ‘सचिनमुळे मी स्टार बनलो’

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कसोटीत पहिल्यांदा गोल्डन डकवर बाद केल्यामुळे मी रातोरात स्टार बनलो, असे म्हणत पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने तेंडुलकरचे आभार मानले आहे. एक काळ असा होता की, शोएब वि. सचिन या लढाईची सार्‍यांनाच उत्सुकता असायची. यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात खेळाडूंमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळायचा. 2003 च्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत सचिन तेंडुलकरने सेंच्युरियन मैदानावर अख्तरचा बाऊन्सरवर पॉईंटच्या दिशेने मारलेला षटकार आजही डोळ्यासमोर ताजा वाटतो.

त्याआधी 1999 साली आशियाई कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील इडन गार्डनवर झालेली लढत सर्वांच्या चांगली लक्षात आहे. त्या सामन्यात अख्तरने सलग दोन चेंडूंत राहुल द्रविड व सचिन यांची विकेट घेत प्रेक्षकांना शांत केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सचिन प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला होता. यामुळे शोएब अख्तर जगाला माहीत झाला.

त्या प्रसंगाची आठवण करून देताना शोएब म्हणाला, कोलकाता कसोटीत राहुल द्रविडला बाद केल्यानंतर सचिन तेंडुलकर मैदानावर आला. सचिन मैदानावर पाऊल ठेवताच प्रेक्षकांनी जो जयघोष केला, त्याने माझी कानठळी बसली. तो आवाज प्रचंड होता आणि हे मी प्रथमच अनुभवत होतो. जवळपास लाखभर लोक सचिनचा जयघोष करत होती. तेव्हा फिरकीपटू साकलेन मुश्ताक मला म्हणाला, ‘तुझी वेळ आलीय, तू त्याला खेळू देणार आहेस का?’ मी म्हणालो ‘नाही.’

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 185 धावा केल्या आणि 70 धावा करणारा मोईन खान हा त्यांचा स्टार ठरला. जवागल श्रीनाथने 46 धावांत 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात एस. रमेशच्या 79 धावांच्या जोरावर भारताने 223 धावा केल्या. सचिन कसोटीत प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला. शोएबने त्या डावात 71 धावांत 4 विकेट्स घेतल्या.

सचिनला बाद करण्यावर शोएब म्हणाला,“सचिन आरामात चालत होता आणि तो क्रीजवर येईपर्यंत मी माझ्या स्टार्ट पॉईंटपर्यंत पोहोचलो आणि धावण्यास सुरुवात केली. सचिन तेव्हा तो नीटसा तयार नव्हता. स्टेडियमवर आवाज एवढा होता की मला कर्णधार वसीम अक्रमचे बोलणेच ऐकू येत नव्हते. सचिनला बाद करण्यासाठी माझी उत्सुकता वाढत चालली होती. सचिन फलंदाजीला तयार झाल्यानंतर मी यॉर्कर टाकला आणि विकेट मिळवली. स्टेडियमवर स्मशानशांतता पसरली. सचिनला बाद केल्यानंतर मी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलो. जर कोणा व्यक्तीने मला स्टार बनवले असेल तर तो सचिन तेंडुलकर आहे.”

Back to top button