IND vs SA T20 : भारताचे द. आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य | पुढारी

IND vs SA T20 : भारताचे द. आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 20 षटकात 4 विकेट गमावून 211 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही भारताची या फॉरमॅटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 5 बाद 203 अशी होती. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताचा सलामीवीर इशान किशनने भारतीय संघाकडून सर्वाधिक 76 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 36 आणि कर्णधार ऋषभ पंतने 29 धावा केल्या. हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकात केवळ 12 चेंडूत 31 धावा केल्या.

अय्यरच्या 27 चेंडूत 36 धावा

टीम इंडियासाठी नंबर-3 वर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने या सामन्यात 27 चेंडूत 36 धावा केल्या. त्याची विकेट ड्वेन प्रिटोरियसने घेतली. अय्यरने सामन्यात 133.33 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

ईशानची बॅट चमकली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात ईशानची बॅट जबरदस्त चमकली. त्याने 48 चेंडूत 76 धावांची खेळी खेळली. त्याने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. यादरम्यान ईशानचा स्ट्राईक रेट 158.33 होता. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले हे ईशानचे तिसरे अर्धशतक आहे.

पर्नेलने टीम इंडियाला पहिला धक्का दिला

पहिल्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांच्यात 38 चेंडूत 57 धावांची भागीदारी झाली. दक्षिण आफ्रिका संघात 6 वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या वेन पर्नेलने गायकवाडची विकेट घेतली. ऋतुराजने सामन्यात 15 चेंडूत 23 धावा केल्या. त्याने 3 षटकार लागावले.

जर भारतीय संघाने आजचा सामना जिंकला तर या फॉरमॅटमध्ये सलग 13 व्या विजयाची नोंद करेल. भारताच्या नजरा विश्वविक्रमाकडे लागल्या असल्या तरी दक्षिण आफ्रिकेचा भारतातील विक्रम भीतीदायक आहे. आफ्रिकेच्या संघाने टीम इंडिया विरुद्ध भारतात 4 टी-20 सामने खेळले असून 3 मध्ये त्यांच्या संघाने विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत :

ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान

दक्षिण आफ्रिका :

क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन प्रिटोरियस, डेव्हिड मिलर, वेन पेर्नेल, तबरीझ शम्सी, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्या, केशव महाराज

Back to top button