जो रूट मोडू शकतो सचिनचा विक्रम : मार्क टेलर | पुढारी

जो रूट मोडू शकतो सचिनचा विक्रम : मार्क टेलर

लंडन ; वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार करून इतिहास रचला. त्यामुळे सध्या जगाच्या कानाकोपर्‍यातून जो रूटवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने तर रूटची तुलना सचिन तेंडुलकरशी केली आहे. टेलरच्या मते, कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रम जो रूट सहज मोडू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने वैयक्तिक 15 हजार 921 धावांचा विक्रम रचलेला आहे. आजपर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही.

सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान मालिकेतील पहिला सामना लॉर्डस् क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. हा सामना यजमान इंग्लंडने जिंकला. माजी कर्णधार जो रूटने नाबाद 115 धावांची खेळी करून विजयामध्ये महत्त्वाचे योगदान दिले. या शतकी खेळीच्या जोरावर जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार करून इतिहास रचला.

रूटने न्यूझीलंड विरुद्ध झळकावलेले शतक हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 26 वे शतक होते. त्यामुळे रूट आता विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या सर्वाधिक कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. कोहली आणि स्मिथ दोघांच्याही नावे 27 कसोटी शतकांची नोंद आहे. या पाश्वर्र्भूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने जो रूटबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा जगातील 14 वा आणि इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला आहे. रूटच्या अगोदर माजी कर्णधार आणि फलंदाज अ‍ॅलिस्टर कुकने हा पराक्रम केलेला आहे. इतकेच नाही तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा पूर्ण करणारा रूट हा जगातील पहिला फलंदाज आहे. रूटने 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत ही कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीवर मार्क टेलर फारच प्रभावित झाला आहे.

मार्क टेलरच्या या वक्तव्याला इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनीही पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, रूटने नेहमीच स्वत:ला जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून सिद्ध केले आहे. त्याचे तंत्र खूपच प्रगत आहे. त्याच्या खेळात सहजपणा आहे. त्यामुळे तो सहज धावांचा डोंगर निर्माण करू शकतो.

Back to top button