‘तुझ्या भोपळ्याचा आकार तुझ्याएवढाच’.. सिक्सरकिंगची चहलवर कमेंट | पुढारी

‘तुझ्या भोपळ्याचा आकार तुझ्याएवढाच’.. सिक्सरकिंगची चहलवर कमेंट

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारतीय संघातील माजी धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग निवृत्त झाल्यापासून तो सोशल मीडियावर विशेष अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. आपल्या माजी सहकारी खेळाडूंच्या पोस्टवर मजेशीर कमेंट्स करून तो धमाल उडवून देतो. त्याने भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या फोटोवर एक मिश्किल कमेंट केली. त्याने चहलची तुलना दुधी भोपळ्याशी केली आहे. युवराजची ही कमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाली आहे.

युजवेंद्र चहलने नुकतीच पंचायत-2 वेबसीरिजसंदर्भात एक पोस्ट केली आहे. या वेबसीरिजमध्ये दुधी भोपळ्याचा एखाद्या पात्राप्रमाणे वापर करण्यात आला आहे. सीरिजमधील सरपंच सचिव असलेल्या जितेंद्रला सतत भोपळा भेट देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही गोष्ट लक्षात घेत चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये चहलने एक दुधी भोपळा बॅटसारखा हातात धरला आहे. ‘मी पैज लावतो माझ्या हातातील भोपळ्याने मारलेला चेंडू स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडेल. तुम्हाला काय वाटते जितेंद्र?’ अशी कॅप्शनही या फोटोला दिली आहे.

अशी पोस्ट केल्याचा चहलला आता नक्की पस्तावा होत असेल. कारण, युवराज सिंगने त्याच्या पोस्टवर कमेंट करून ट्रोल केले आहे. ‘तुझ्या भोपळ्याचा आकार तुझ्याएवढाच आहे,’ अशी कमेंट युवराजने केली आहे. ही कमेंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. युवराज आणि चहलची सोशल मीडियावर सतत मजेशीर शाब्दिक कुस्ती सुरू असते. आयपीएलचा 15वा हंगाम सुरू होण्यापूर्वी चहलने राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी घालून फोटो पोस्ट केला होता. त्यावरदेखील युवराज सिंगने मजेशीर कमेंट केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

Back to top button