लॉर्ड्स मैदानावरील भारताची कामगिरी काय सांगते? - पुढारी

लॉर्ड्स मैदानावरील भारताची कामगिरी काय सांगते?

लंडन : पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना ( ENG vs IND 2nd Test ) ऐतिहासिक लॉर्ड्स वर होत आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे ड्रॉ झाला होता. त्यामुळे आता लॉर्ड्सवरील सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न भारतीय संघ करणार आहे.

पण, भारतासाठी लॉर्ड्सवर सामना जिंकणे सोपे नाही. कारण भारताचा लॉर्ड्सवरील इतिहास हा फारसा आशादायी नाही. त्यामुळे हा इतिहास बदलणारी कामगिरी टीम इंडियाला करावी लागणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून बऱ्याच काळापासून मोठी खेळी झालेली नाही. ही खेळी त्याला ऐतिहासिक लॉर्ड्सवर ( ENG vs IND 2nd Test ) करण्याची संधी आहे.

भारताची लॉर्ड्सवरील कामगिरी

– लॉर्ड्सवर भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध १८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील १२ कसोटी सामने इंग्लंडने जिंकले आहेत तर भारताला केवळ २ कसोटी सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर ४ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने शेवटचा कसोटी सामना २०१८ मध्ये खेळला होता. त्यात भारताचा एक डाव आणि १५९ धावांनी दारून पराभव झाला होता.

– लॉर्ड्सवर भारताचेी विजयाची टक्केवारी फक्त ११ टक्के इतकीच आहे. तर इंग्लंडची विजयाची टक्केवारी ६६ इतकी आहे.

– लॉर्ड्सवर झालेल्या गेल्या पाच सामन्यात भारताने २०१४ च्या दौऱ्यावर फक्त एकदाच विजय मिळवला आहे. इतर तीन सामन्यात त्याला पराभवाचे तोंड पहावे लागले आहेत.

– लॉर्ड्सवर इशांत शर्माने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने एका डावात ७ विकेट घेतल्या आहेत. त्याने २०१४ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली होती. इशांतने ७४ धावा देत ७ विकेट घेतल्या होत्या. २८ वर्षानंर भारताने लॉर्ड्सवर सामना जिंकला होता. त्यामुळेच या दौऱ्यातील लॉर्ड्स सामन्यात त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

१९८६ ला लॉर्ड्सवर पहिल्यांदा भारत जिंकला

लॉर्ड्स मैदानावर भारताने पहिल्यांदा १९८६ साली विजय मिळवला होता. त्या कसोटीत भारताने इंग्लंडला ५ विकेट्सनी मात दिली होती. कपिल देव यांनी सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. इंग्लंडने पहिल्या डावात २९४ धावा केल्या होत्या.

त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात ३४१ धावा उभारल्या. त्यात दिलीप वेंगसरकर यांच्या १२६ धावांच्या दमदार खेळीचा मोठा वाटा होता. दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव घसरला, त्यांनी सर्वबाद १८० धावा केल्या. भारताकडून कपिल देव यांनी ४ तर मनिंदर सिंह यांनी ३ विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताने इंग्लंडने ठेवलेले १३३ धावांचे आव्हान ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताचा हा लॉर्ड्सवरील पहिला विजय होता.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : कणखर सह्याद्रीत दरडी का कोसळत आहेत?

Back to top button