सीएसकेला अजून एक धक्का, दिग्गज खेळाडू भारतात परतणार  | पुढारी

सीएसकेला अजून एक धक्का, दिग्गज खेळाडू भारतात परतणार 

दुबई : पुढारी ऑनलाईन 

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोघातील लढतीने आयपीएल 2020 ची सुरुवात होणार आहे. पण, या पहिल्याच सामन्यापूर्वी सीएसकेवर अनेक संकटे ओढवत आहेत. आज ( दि. 4 ) सीएसके संघातील दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. आयपीएलमधून माघार घेणारा तो सीएसकेचा दुसरा खेळाडू आहे. त्याने ट्विट करुन याची माहिती दिली. त्यानेही आपण वैयक्तीक कारणाने आयपीएलमधून माघार घेत असल्याचे सांगितले. 

हरभजनने ‘माझ्या प्रिय मित्रांनो मी वैयक्तीक कारणाने यंदाची आयपीएल खेळू शकत नाही. हा खूप कठिण काळ आहे आणि मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी प्रायव्हसी हवी आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने अत्यंत सहकाऱ्याची भुमिका घेतली आहे आणि त्यांना यंदाच्या आयपीएलसाठी शुभेच्छा, सुरक्षित रहा आणि जय हिंद.’ असे ट्विट केले. 

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आयपीएलचा यंदाचा 13 वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात येणार आहे. तीन वेळा आयपीएल जिंकणारी सीएसकेची टीम 21 ऑगस्टला मुंबई इंडियन्स आणि आरसीबीबरोबर संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल झाली होती.  

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमध्ये दाखल होण्यापूर्वी सीएसकेने चेन्नईत एक छोटे सराव सत्र आयोजित केले होते. भारतात असा सराव करणारी चेन्नई ही एकमेव टीम आहे. गेल्या आठवड्यात सीएसकेचे 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमधील त्यांच्या सराव शिबीराला उशीर झाला. 13 पॉझिटिव्ह आलेल्या सदस्यांव्यतिरिक्त इतर खेळाडूंची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी आजपासून आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. तोपर्यंतच हरभजनने आपण आयपीएलमधून माघार घेत असल्याचे ट्विट केले.

यापूर्वी सुरेश रैनानेही वैयक्तीक कारणानेच आयपीएलमधून माघार घेतली होती. यावरून सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी वादग्रस्त वक्तव्य करत रैनाला खडे बोल सुनावले होते. पण, नंतर रैनाने खुलासा केला आणि श्रीनिवासन यांनी नरमाईची भुमिका घेतली. 

Back to top button