‘बायो सिक्युर’ आयपीएल ( पार्ट 2 ) | पुढारी

‘बायो सिक्युर’ आयपीएल ( पार्ट 2 )

प्रेक्षकांविना होणारी पहिली आयपीएल

‘आयपीएल-2020’चे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याच संघाच्या पाठिराख्यांना मैदानात प्रवेश निषिद्ध असणार आहे. त्यामुळे कितीही मोठी खेळी करा, कितीही विकेट काढा, कितीही षटकार मारा किंवा कितीही अवघड झेल घ्या मैदानावर असणार ती नीरव शांतता. यामुळे खेळाडूंनाही गेल्या 12 वर्षांपासून अविरत मिळणार्‍या पाठिराख्यांच्या सहवासाला मुकावे लागणार आहे. आता विराटला प्रेक्षक गॅलरीकडे बघून आनंद व्यक्‍त करता येणार नाही किंवा विंडीजच्या खेळाडूंना प्रेक्षकांच्या समोर कॅरेबियन नृत्यही करता येणार नाही. क्रिकेटच्या आत्म्यात समाविष्ट असलेल्या या सर्व गोष्टी यंदाच्या आयपीएलमध्ये नसणार. प्रेक्षकांचा जल्लोष आणि सामन्याला जिवंतपणा आणणारा त्यांचा मैदानावरचा गोंगाट हा कृत्रिमरीत्या तयार करण्याचाही पर्याय बीसीसीआय समोर आहे; पण बीसीसीआयने अजून तरी याबाबत कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. 

चेंडूला लाळ लावणे आता बंद

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने 9 जूनला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही तत्कालिक नियम बदलल्याची घोषणा केली. यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आता क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाला चेंडूला लाळ लावून त्याला चकाकी आणता येणार नाही. याचबरोबर अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने आंतरराष्ट्रीय मालिकेत स्थानिक पंचांची नेमणूक करण्याची शिफारस स्वीकारण्यात आली आहे. हे सर्व बदल कोरोनाच्या वैश्‍विक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी करण्यात आले आहेत.

या नव्या नियमांची अंमलबजावणी करताना गोलंदाजांसमोर चांगल्याच अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ लावण्याची अनेक वर्षांची सवय बदलावी लागणार आहे. तसेच, लाळ लावली नाही तर मग चेंडूला चकाकी कशी आणायची आणि चकाकी नाही आली तर चेंडू स्विंग कसा करायचा हे सर्व प्रश्‍न गोलंदाजांना भेडसावण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या नियमाचे उल्लंघन केल्यानंतर पंच त्यांना वॉर्निंग देतील आणि त्यानंतर जर पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन झाले तर फलंदाजी करणार्‍या संघाला 5 धावा बहाल केल्या जातील. संघाला याबाबत दोन वेळा वॉर्निंग मिळेल. तसेच, पंच त्यांना चेंडू स्वच्छ करण्याची सूचनाही करतील. याचबरोबर सामन्यादरम्यान आता ‘सॅनिटायझर ब्रेक’ही असतील.

चेंडूला लाळ लावण्याच्या नियमाबरोबरच अजून एका नव्या नियमाचा समावेश करण्यात आला आहे. जर कसोटी सामना सुरू असताना कोणाला कोरोना सद‍ृश्य लक्षणे आढळून आली तर त्या खेळाडूच्या बदली दुसरा खेळाडू खेळवण्याची मुभा मिळणार आहे. कसोटी सामन्यात खेळाडूंना कोरोना सद‍ृश्य लक्षणे आढळून आली तर संघांना त्यांच्या बदली खेळाडू खेळवण्याची मुभा मिळणार आहे. हा बदली (ढोबळमानाने फलंदाजाला फलंदाज, गोलंदाजाला गोलंदाज) खेळाडू देण्याचा अधिकार सामनाधिकारी यांच्याकडे असेल.  

याचबरोबर तटस्थ पंचांच्या ऐवजी स्थानिक पंचच सामन्यात पंचगिरी करतील, असाही नियम करण्यात आला आहे. त्यामुळे आता सामन्यातील दोन्ही पंच हे आयोजक देशाचेच असतील. या नियमाला अनुसरून डीआरएस नियमातही बदल करण्यात आला आहे. दोन्ही स्थानिक पंचांचा अनुभव पाहता निर्णयात चुका होण्याची शक्यता असल्याने तिन्ही क्रिकेट प्रकारांत दोन्ही संघांना प्रत्येक डावात एक अतिरिक्‍त रिव्ह्यू मिळणार आहे.  

दूरवरून समालोचन आणि स्पर्शाविना अंपायरिंगची शक्यता

आयपीएलचे थेट प्रक्षेपण हे भारतातूनच करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत बीसीसीआयने कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, यामागे जास्त प्रवास टाळणे आणि ‘बायो सिक्युर’ वातावरणातील लोकांची अवास्तव गर्दी टाळणे हा उद्देश असू शकतो. आता या गोष्टी प्रत्यक्षात उतरतात की नाही हे पाहावे लागेल. याचबरोबर इंग्लंड वेस्ट इंडिज मालिकेतील गोलंदाजीपूर्वी ‘बायो सिक्युर’ वातावरणात स्वेटर, टोपी आणि वैयक्‍तिक गोष्टी पंचांकडे देण्यास मनाई होती. ही मनाई स्पर्श टाळण्यासाठी होती. हीच पद्धत आयपीएलमध्येही राबवण्याची शक्यता आहे.

युरोपियन कंपनीकडे जबाबदारी

आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लोकप्रिय टी – 20 स्पर्धेसाठी ‘बायो सिक्युर बबल’ तयार करण्याची जबाबदारी युकेतील सुरक्षेसंदर्भात काम करणारी कंपनी ‘रेस्ट्राटा’कडे दिली आहे. रेस्ट्राटा ही युनायटेड किंगडम आणि संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये कार्यरत आहे. त्यांनी टाटा ग्रुपला मागे टाकून हे काम मिळवले आहे.

या कंपनीचे सर्व स्तरावरची सुरक्षितता आणि दळणवळण कार्यान्वित करण्यात महारत आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबर 2012 ला लंडन गेम्सदरम्यान काम केले आहे. याचबरोबर त्यांनी नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान बरोबरच्या इंग्लंडच्या मालिकेतही ‘बायो सिक्युर बबल’ तयार करण्यासाठी काम केले आहे. त्यांच्या कामामुळेच तब्बल 5 महिन्यांनंतर जागतिक क्रिकेट पुन्हा मैदानावर आले आहे.  

त्यांनी आयपीएलची डील जिंकण्यात मोठा वाटा हा त्यांच्या प्रस्तावातील किफायतशीरपणाचा आहे. टाटा ग्रुप पेक्षा त्यांनी किफायतशीर प्रस्ताव ठेवला. याचबरोबर त्यांनी नुकतेच झालेल्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये कामात दाखवलेल्या सफाईदारपणा, क्रिकेट स्पर्धेसाठी काम केल्याचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या.  

बीसीसीआयने रेस्ट्राटा कंपनीबाबत सर्व फ्रेंचायजींना कळवले आहे. आता यूएईत रेस्ट्राटाच्या मुख्य ‘बायो सिक्युर बबल’मध्ये आयपीएलची इकोसिस्टम कार्यरत होणार आहे.  काही रिपोर्टनुसार टाटा ग्रुपने रेस्ट्राटापेक्षा दुप्पट पैशांचे टेंडर भरले होते.
(उत्तरार्ध)

Back to top button