IPL: CSK ला भेडसावणार दिग्गजांची अनुपस्थिती | पुढारी

IPL: CSK ला भेडसावणार दिग्गजांची अनुपस्थिती

दुबई : पुढारी ऑनलाईन

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगाम १३ मधून सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. हे दोघेही महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाकडून खेळतात. रैना व हरभजन हे आयपीलमधील अनुभवी व यशस्वी खेळाडू आहेत. या दोघांच्या गैरहजेरीमुळे तीनवेळा आयपीएलवर नाव कोरणा-या चेन्नईच्या संघाच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. 

आयपीएलमध्ये सर्वाधिक १२४९ डॉट बॉलचा विक्रम ऑफ स्पिनर हरभजनच्या नावावर आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वाधिक ५३६८ धावा करणारा सुरेश रैना दुसरा फलंदाज आहे. फलंदाजीत तिसर्‍या क्रमांकावर येणा-या रैनाकडे परिस्थितीनुसार धावांचा वेग वाढविण्याची क्षमता आहे. तर, हरभजन हा केवळ प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट पटकावतो असे नाही तर तो धावगतीही नियंत्रणात ठेवण्यात पटाईत आहे. 

आयपीएलमध्ये फक्त दोन फलंदाजांनी केल्या ५ हजार धावा 

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन फलंदाज आहेत ज्यांनी ५००० हून अधिक धावा केल्या आहेत, त्यातील रैना दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने १९३ सामन्यात ३३.३४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीने १७७ सामन्यांत स्पर्धेतील सर्वाधिक ५४१२ धावा केल्या आहेत. रैनाचा स्ट्राइक रेट कोहलीच्या तुलनेत चांगला आहे. कोहलीने १३१.६१ च्या तर रैनाने १३७.१४ च्या स्ट्राइक रेटने धावा वसूल केल्या आहेत.

सर्वाधिक विकेट घेणारा हरभजन तिसरा गोलंदाज…

हरभजनने आयपीएल स्पर्धेतील १६० सामन्यात २६.४४ च्या सरासरीने १५० बळी घेतले आहेत. तो तिसर्‍या क्रमांकावर आहे. या बाबतीत मुंबई इंडियन्सचा श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगा अव्वल स्थानी आहे. त्याने १२२ सामन्यात १७० विकेट बळी घेतल्या आहेत.

भज्जीचा इकॉनॉमी रेट मलिंगाच्या तुलनेत चांगला आहे. मलिंगाने ७.१४ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत. त्याचवेळी हरभजनचा इकॉनॉमी रेट ७.०५ आहे. हरभजन सिंग फक्त एकदाच २०१८ मध्ये चॅम्पियन राहिलेल्या सीएसके संघाचा भाग राहिला आहे. त्यावेळी त्याने संपूर्ण स्पर्धेत १५ सामन्यांमध्ये ७ विकेट पटकावल्या होत्या. त्याने २०१० मधील हंगामात १५ सामन्यात १७ आणि २०११ च्या हंगामात १५ सामन्यात १४ बळी घेतले. 

हरभजनशिवाय संघात तीन फिरकी गोलंदाज आहेत. यात दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिर, न्यूझीलंडचा डावखुरा मिशेल सेंटनर आणि भारतीय लेगस्पिनर पीयूष चावला यांचा समावेश आहे. भज्जीनंतर सेंटरला अधिक संधी मिळू शकते. त्याने आयपीएलचे फक्त चार सामने खेळले असून ४ विकेट्स घेतल्या आहेत. तथापि, न्यूझीलंडकडून खेळत त्याने ४४ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात २१.०८ च्या सरासरीने ५२ विकेट्स घेतल्या आहेत.

फलंदाजीत धोनी घेईल प्रमोशन? 

तिस-या क्रमांकावर फलंदाजीस येणा-या डावखु-या सुरेश रैनाची गैरहजेरी सीएसके व कर्णधार धोनीला नक्कीच अडचणीत टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी संघाच्या फलंदाजी क्रमावारीत बदल होऊ शकतो. गोलंदाज म्हणून रैनाने आयपीएलमध्ये एकूण २५ बळी घेतले आहेत. हा आकडा छोटा वाटू शकेल, पण धोनीने रैनाचा उपयोग खेळाच्या मध्यातील षटकात प्रतिस्पर्धी संघाच्या धावगतीला लगाम घालण्यासाठी करून घेतला आहे. रैनाच्या अनुपस्थितीत स्वत: धोनी फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर येईल अशी शक्यता आहे. तर आपल्या जागी तो केदार जाधवला पाठवेल असेही तज्ज्ञांचे मत आहे. अष्टपैलू सॅम कुरेन आणि रवींद्र जडेजा यांच्याही फलंदाजी क्रमवारीत बदल होऊ शकतो. दरम्यान, रैनाने टीममधून माघार घेतल्यानंतर संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनी युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडला रैनाची जागा मिळू शकते, असे संकेत दिले आहेत.

‘बायो सिक्युर’ आयपीएल ( पार्ट 2 )

डोळे दान करून जडेजाच्या पत्नीने साजरा केला वाढदिवस!

IPL Flash Black : डेक्‍कन चार्जर्सने गाजवला दुसरा हंगाम

Back to top button