IPL flash back : चेन्नई पर्वाचा उदय | पुढारी

IPL flash back : चेन्नई पर्वाचा उदय

2010 मध्ये आयपीएलचे तिसरे पर्व भारतात पार पडले. आतापर्यंत ही स्पर्धा जगात चांगलीच प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे या स्पर्धेला 200 मिलियन लोकांनी टेलिव्हिजनवर ही स्पर्धा पाहिली. यू ट्यूबवर थेट प्रसारित झालेली ही पहिली स्पर्धा ठरली. याशिवाय भारतातील अनेक चित्रपटगृहांमध्ये याचे थ्रीडीमध्ये प्रसारण करण्यात आले.

आयपीएलचे दोन प्रबळ संघ आणि ज्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड खुन्नस असते ते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. त्यात चेन्नई सुपरकिंग्सने बाजी मारली आणि विजेतेपद पटकावले. आयपीएल 2010 ही स्पर्धा 12 मार्च ते 25 एप्रिल या काळात खेळवण्यात आली. स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांदरम्यान खेळवण्यात आला. हा सामना केकेआरने 11 धावांनी जिंकला. 

आयपीएलमधील सर्वात महागडा संघ असूनही पहिल्या दोन सत्रांत चांगली कामगिरी करता न आलेल्या मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत कात टाकून दिमाखदार कामगिरी केली. त्यांनी साखळी फेरीतील 14 पैकी दहा सामने जिंकून 20 गुणांसह बाद फेरी गाठली. साखळी फेरीतही त्यांचा सरासरी रनरेट 1.084 इतका दमदार होता. गतविजेता डेक्कन चार्जर्सचा संघ साखळी फेरीत यावेळी दुसर्‍या क्रमांकावर राहिला. त्यांनी 14 पैकी 8 सामने जिंकले होते. त्यांचे 16 गुण होते. स्पर्धेतील तिसर्‍या आणि चौथ्या स्थानासाठी प्रचंड चुरस झाली. चेन्नई सुपरकिंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या चारही संघांचे प्रत्येकी 14 गुण झाले होते. पण, चेन्नई (+0.274) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (+0.219) हे सरस रनरेटच्या आधारे अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर पोहोचले, तर दिल्ली डेअरडेव्हिल्स (+0.21) आणि केकेआर (-0.341) हे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे, चेन्नई, आरसीबी, आणि दिल्ली यांच्यापेक्षा डेक्कन चार्जर्सचा रनरेट (-0.297) कमी असूनही त्यांनी केवळ एक सामना जास्त जिंकल्यामुळे 16 गुणांसह ते दुसर्‍या स्थानावर पोहोचले होते. 

स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स संघाला 35 धावांनी हरवून अंतिम फेरी गाठली. दुसर्‍या उपांत्य सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने डेक्कन चार्जर्सला 38 धावांनी हरवून अंतिम फेरी गाठली. 

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील अंतिम सामना नेरळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या चेन्नईने 20 षटकांत 5 बाद 168 धावा केल्या. सुरेश रैनाने 35 चेंडूंत 57 धावांची वादळी खेळी केली. याचा पाठलाग करताना मुंबईला फक्त 9 बाद 146 धावापर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून कर्णधार सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 48 धावा केल्या. मुंबईला 22 धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. 

आयकॉन सचिन 

2010च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा आयकॉन खेळाडू सचिन तेेंडुलकर याने सर्वाधिक 618 धावा करीत ऑरेंज कॅपचा बहुमान पटकावला. या धावा त्याने 466 चेंडू खेळून काढल्या. या स्पर्धेत त्याने 132.61 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. 89 धावा ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी होती. स्पर्धेत त्याने 5 अर्धशतके नोेंदवली. सचिनने 86 चौकार ठोकणार्‍या सचिनने स्पर्धेत फक्त तीनच षटकार ठोकले होते. 

Back to top button