कमनशिबी आरसीबी | पुढारी | पुढारी

कमनशिबी आरसीबी | पुढारी

विराट कोहलीसारखा जागतिक दर्जाचा फलंदाज संघाचा नेता, जगातील अनेक स्टार खेळाडूंचा संघात भरणा, आतापर्यंत अनेक वैयक्‍तिक आणि सांघिक विक्रम नावावर लागले; पण नावापुढे लागले नाही ते आयपीएलचे विजेतेपद. अशा या कमनशिबी संघाचे नाव आहे, रॉयल चॅलेंजर्स बेेंगलोर!

2008 मध्ये आयपीएल लिलावात बेंगलोर शहराची फ्रँचाईजी मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या युनायटेड स्पिरीट लिमिटेड या कंपनीने 111.6 मि. डॉलर्स इतक्या रकमेला मिळवली. त्यावेळी मुंबई पाठोपाठ हा दुसर्‍या क्रमांकाचा महागडा संघ ठरला होता. राहुल द्रविड हा या संघाचा ‘आयकॉन प्लेअर’ होता. सतत मदिरा आणि मदिराक्षीच्या घोळक्यात वावरणारा विजय मल्ल्या या संघाचा मालक असल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाला पहिल्यापासून वेगळेच ग्लॅमर लाभले आहे. परंतु, त्यांना विजेतेपदाची झालर मात्र लावता आली नाही. 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहोचूनही त्यांना विजेतेपदाने हुलकावणी दिली.  

सध्या टीम इंडियाचा कर्णधार असलेला विराट कोहली हा आरसीबीचा कर्णधार आहे. 2020 च्या हंगामापूर्वी आरसीबीने आकाशदिप नाथ, कोलिन-डी-ग्रँडहोमे, कुलवंत खजोरिया, मार्कस स्टोईनिस, डेल स्टेन, मिलिंद कुमार, नॅथन कुल्टर नाईल, प्रयास राय बर्मन, शिमरोन हेटमायर, टीम साऊदी या खेळाडूंना रिलिज केले आणि त्यानंतर झालेल्या लिलावात अ‍ॅरोन फिंच (4.4 कोटी) ख्रिस मॉरिस (10 कोटी), जोशुआ फिलिप्पे (20 लाख), केन रिचर्डसन (4 कोटी), पवन देशपांडे (20 लाख), शाहबाज अहमद (20 लाख), इसुरू उदाणा (50 लाख) यांना संघात सहभागी करून घेतले. याशिवाय डेल स्टेनवर पुन्हा विश्‍वास दाखवताना त्याला 2 कोटी रुपयांना परत खरेदी केले. 

टीम इंडियाच्या कर्णधाराचा संघ म्हणून आरसीबीकडून चाहत्यांना विजेतेपदाची अपेक्षा आहे. 2011 ते 2017 या काळात ख्रिस गेल नावाचे वादळ आरसीबी संघात होते. हे वादळ अनेकदा रौद्ररुप धारण करीत होते. परंतु, संघाला अजिंक्यपद मिळवून देण्यात तो कमी पडला. आता तो संघात नाही. परंतु, दक्षिण आफ्रिकेचा ‘मिस्टर 360 डिग्री’ म्हणून ओळखला जाणारा ए. बी. डिव्हिलीयर्स अजूनही आरसीबीच्या तंबूत आहे. विराट कोहली आणि एबी या दोघांवरच आरसीबीच्या फलंदाजीची मदार आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच यंदापासून लाल जर्सीत खेळताना दिसेल. तो यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलसह सलामीला येईल. रणजीसह देशांतर्गत स्पर्धेत यंदा चांगला खेळ करणारा देवदत्त पडिकल हा स्थानिक युवा खेळाडू अनकॅप्ड खेळाडू म्हणून संघात असेल. 

संघात मोईन अली, इसुरू उदाना, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर हे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. फिरकी गोलंदाजीत यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, अ‍ॅडम झम्पा, पवन नेगी, शाहबाज अहमद असे गुणवान खेळाडू आहेत. चहल, सुंदर आणि झम्पा हे तिघेही सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे. वेगवान गोलंदाजांच्या फळीत भारताचा अनुभवी गोलंदाज उमेश यादवच्या जोडीला नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज हे युवा गोलंदाज आहेत. याशिवाय डेल स्टेन, ख्रिस मॉरिस हे परदेशी गोलंदाज आपल्या अनुभवाचा फायदा संघाला मिळवून देऊ शकतात. हार्डहिटर फलंदाज असलेला डावखुरा शिवम दुबेही मध्यमगती गोलंदाजी करू शकतो. 

जे बारा सत्रात झाले नाही ते करून दाखवण्याचे आव्हान आता विराट कोहलीच्या आरसीबी संघापुढे आहे. यात तो कितपत यशस्वी होतो ते पाहावे लागेल. 

गत हंगाम निराशाजनक

2019 च्या हंगामात आरसीबीच्या वाट्याला निराशाच जास्त आली. त्यांचा हुकमी एक्‍का जलदगती गोलंदाज डेल स्टेन हा सुरुवातीला जखमी असल्याने खेळू शकला नाही. परंतु, नंतर तो संघात सहभागी झाला. मात्र, तीन सामने खेळल्यानंतर खांदा दुखावल्याने तो स्पर्धा सोडून मायदेशी गेला. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही आरसीबीला 14 पैकी फक्‍त पाचच सामने जिंकता आले. तर, एक सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर राहिला.

संघाच्या नावात ‘मॅक्डॉल नंबर वन’ किंवा ‘रॉयल चॅलेंजर्स’ या आपल्या मद्य ब्रँडचा समावेश असावा असा मल्ल्याचा आग्रह होता. त्यानुसार संघाचे नाव ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर’ असे ठेवण्यात आले. बंगळुरूमधील चिन्‍नास्वामी स्टेडियम हे संघाचे होमग्राऊंड आहे. लाल आणि सोनेरी पिवळा असे संघाचे प्राथमिक रंग आहेत. याशिवाय संघ पर्यावरण बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून प्रत्येक स्पर्धेत एक सामना हिरव्या/पोपटी रंगाच्या जर्सीत खेळतो. 2020 साली नव्या जर्सीत संघाने निळसर काळा रंग अ‍ॅड केला आहे. कॅटरिना कैफ, दीपिका पदुकोण, रम्या यासारख्या अभिनेत्री या संघाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसीडर राहिलेल्या आहेत. 

Back to top button