मुंबई इंडियन्स कानामागून आली आणि तिखट झाली | पुढारी

मुंबई इंडियन्स कानामागून आली आणि तिखट झाली

2015 चा आयपीएलचा हंगाम सुरू झाला त्यावेळी राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स हे संघ दमदार कामगिरी करीत होते. राजस्थान रॉयल्सने तर सुरुवातीच्या पाच सामन्यांपैकी सर्व पाच सामने जिंकून 10 गुण पटकावले होते. तर चेन्नईने 5 पैकी 4 सामने जिंकून 8 गुण मिळवले होते. याशिवाय, कोलकात्याने 5 पैकी 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले होते. तर मुंबई इंडियन्सने पहिल्या चार सामन्यांत आपले खातेही उघडले नव्हते. अखेर त्यांनी पाचवा सामना जिंकून आपले गुणांचे खाते उघडले; पण जसजशी आयपीएल पुढे सरकत गेली तसतसे हे चित्र पालटत गेले. मुंबई इंडियन्सने सलग पाच सामने जिंकून जोरदार मुसंडी मारली. या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्स 16 गुणांसह गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर पोहोचली. तर, चेन्नई सुपर किंग्जने 18 गुणांसह पहिले स्थान पटकावले होते. 

सलग पाच सामने जिंकून हंगामाची दमदार सुरुवात करणार्‍या राजस्थानचे दोन सामने अनिर्णीत राहिले. याचा फटका त्यांना गुणतालिकेत बसला हा संघ 16 गुणांसह चौथ्या स्थानावर फेकला गेला. 16 गुण मिळवणार्‍या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने सरस नेट रनरेटच्या जोरावर तिसरे स्थान मिळवले. 2015 च्या हंगामात ‘प्ले ऑफ’मध्ये गेलेल्या चेन्नईला सोडले तर सर्वांचेच गुण समान झाले होते; पण मुंबईने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोरपेक्षा एक सामना जास्त जिंकल्याने त्यांची क्वालिफायरमध्ये वर्णी लागली.

स्पर्धेच्या उत्तरार्धात सूर गवसलेल्या मुंबई इंडियन्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात बलाढ्य अशा चेन्नई सुपर किंग्जसमोर 187 धावांचे आव्हान उभे केले. मात्र, सीएसकेला हे आव्हान पेलवले नाही त्यांचा डाव 162 धावांतच आटोपला. या विजयामुळे मुंबई इंडियन्स थेट अंतिम सामन्यात पोहोचली. त्यानंतर एलिमीनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने राजस्थान रॉयल्सवर 71 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर बेंगलोरने राजस्थानसमोर 180 धावांचे टार्गेट ठेवले होते; पण राजस्थानचा पूर्ण संघ 109 धावांत माघारी परतला. आरसीबीने राजस्थानवर 71 धावांनी दणदणीत विजय मिळवून क्वालिफायर टू मध्ये दिमाखात प्रवेश केला. मात्र, क्वालिफायर टू मध्ये चेन्नईने त्यांचा हा धडाका रोखत त्यांना 139 धावांतच गारद केले. सीएसकेचीही आरसीबीचे हे 139 धावांचे माफक आव्हान पार करताना दमछाक झाली. त्यांना हे आव्हान पार करण्यासाठी 19.5 षटके खेळावी लागली आणि 7 फलंदाज खर्ची घालावे लागले; पण अखेर चेन्नईने सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मरालीच.

अखेरच्या क्षणी जिंकून अंतिम फेरी गाठलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात पाणी पाजले. प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबईने सलामीवीर लिंडन सिमन्स, रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसके समोर 202 धावांचे मोठे आव्हान ठेवले. मात्र, सीएसकेचा सलामीवीर ड्वेन स्मिथने 57 धावांची अर्धशतकी खेळी करीत चांगली सुरुवात करून देऊनही सीएसकेला 161 धावांपर्यंतच मजल मारता आली. सीएसकेच्या मधल्या फळीने निराशा केल्यामुळे त्यांना मुंबईचे 202 धावांचे आव्हान पेलवले नाही आणि मुंबईने दुसर्‍यांदा आयपीएलवर आपले नाव कोरले. 2015 चा आयपीएल हंगाम जिंकून मुंबईने सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्यात सीएसकेशी बरोबरी साधली होती. 

Back to top button