सुपरहिटच्या प्रतीक्षेत ‘किंग खान’चा केकेआर | पुढारी

सुपरहिटच्या प्रतीक्षेत ‘किंग खान’चा केकेआर

केकेआर संघाने आतापर्यंत 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. या दोन्ही वेळेला संघाचे नेतृत्व गौतम गंभीर याने केले होते. सध्या या संघाची धुरा भारताचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सांभाळत आहे. संघाने ब्रँडन मॅक्युलम यांना प्रशिक्षक म्हणून नेमले आहे. विशेष म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामात ब्रँडन मॅक्युलम हा केकेआरकडून खेळला होता आणि त्याने स्पर्धेच्या उद्घाटनाच्या लढतीत दीडशतकी खेळी केली होती. 

2020 च्या लिलावात केकेआरने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजाला साडेपंधरा कोटी रुपये देऊन आपल्या संघात सहभागी करून घेतले. हा एक नवा विक्रम ठरला आहे. कमिन्स हा सर्वात जास्त किंमत मिळालेला परदेशी खेळाडू ठरला आहे. याचबरोबर संघाने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याला सव्वापाच कोटी रुपयांना खरेदी केले; पण तत्पूर्वी संघाने सलामीवीर ख्रिस लीन, स्फोटक फलंदाज कार्लोस ब्रेथवेट यांच्याबरोबर रॉबिन उथप्पा यालासुद्धा रिलिज केले. 2014 च्या विजेतेपदामध्ये उथप्पाचा वाटा मोठा होता. त्याने त्यावर्षी 660 धावा करून ‘ऑरेंज कॅप’ पटकावली होती. 

यामुळे संघात सध्या फलंदाजीत कोणतेही मोठे नाव दिसत नाही. वरच्या फळीत मॉर्गन हा एकमेव अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जोडीला नितीश राणा, शुभमन गिल, रिंकू सिंग, सिद्धेश लाड आणि राहुल त्रिपाठी अशी युवा खेळाडूंची फौज आहे. कर्णधार कार्तिक हा यष्टिरक्षणाचीही धुरा सांभाळणार आहे. वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल हा अष्टपैलू खेळाडू कधीही सामन्याचा नूर पालटू शकतो. गेल्या हंगामात केकेआरने फिरकी गोलंदाज सुनील नरेनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग केला, तो काही अंशी सफल झाला. त्यामुळे फलंदाजीतही त्याच्यावर गोलंदाजी इतका भरवसा ठेवण्यास हरकत नाही. चायनामन रिस्ट स्पीनर कुलदीप यादव नरेनला चांगली साथ देऊ शकतो. 

साडेपंधरा कोटी रुपयांना विकत घेतलेला पॅट कमिन्स हा संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. लॉकी फर्ग्युसन हा त्याला दुसर्‍या बाजूने साथ देईल. प्रसिद्ध कृष्णा याने गेल्या सत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्याकडून यंदाही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ‘अंडर-19 वर्ल्ड कप’चे स्टार गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी यांच्यासाठी ही स्पर्धा मोठी संधी असेल.

2008 मध्ये झालेल्या लिलावात अभिनेता शाहरुख खान याच्या रेडचिलीज एंटरटेन्मेंटने हा संघ 75.09 मिलियन डॉलर्स इतक्या रकमेला विकत घेतला. अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्या मेहता ग्रुपचीही यामध्ये भागीदारी आहे.  कोलकाताचे इडन गार्डन हे या संघाचे होमग्राऊंड आहे. कोरबो.. लोडबो.. जितबो (आम्ही खेळू.. लढू.. आणि जिंकू) हे या संघाचे घोषवाक्य आहे. जांभळा आणि सोनेरी हे दोन या संघाचे अधिकृत रंग आहेत. 1980 च्या सुमारास अमेरिकन चॅनेलवर ‘नाईट रायडर्स’ नावाची मालिका गाजली होती. त्यावरून शाहरुखने आपल्या संघाला ‘कोलकाता नाईट रायडर्स’ असे नाव दिले आहे. 

Back to top button